काल अमेरिकेचे लष्करी विमान बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन भारतात पोहोचले. बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची पहिली तुकडी अमेरिकन सी-१४७ विमानाने भारतात आली. या विमानात १०४ भारतीय होते. या प्रकरणावरुन आज संसदेत मोठा गोंधळ झाला, विरोधकांनी या मुद्द्यावरुन सरकारला घेरले. बुधवारी अमेरिकन आर्मीचे विमान या भारतीयांना घेऊन अमृतसरला पोहोचले. अमेरिकेतून पाठवलेल्या लोकांच्या हातपायात बेड्या बांधलेल्या होत्या, असा काँग्रेसचा दावा आहे. यावरुन आता काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
अमेरिकेने बाहेर काढलेल्या भारतीयांमध्ये १९ महिला, १३ अल्पवयीन; डबल पैसे खर्च करुन सोडून गेले
खासदार प्रियंका गांधी म्हणाल्या, "अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी हे खूप चांगले मित्र आहेत असे अनेक वेळा बोलले जात होते. पंतप्रधान मोदींनी हे का होऊ दिले? त्यांना परत आणण्यासाठी आपण आपले विमान पाठवू शकलो नसतो का? लोकांसोबतअसेच वागले जाते का? त्यांना हातकड्या आणि बेड्या घालून परत पाठवले जाते का? परराष्ट्र मंत्री आणि पंतप्रधानांनी उत्तर द्यावे, असा निशाणा प्रियांका गांधी यांनी केला.
दरम्यान, या घटनेवर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "ज्या पद्धतीने हे घडले त्याचा आम्ही निषेध करत आहोत. त्यांना त्या लोकांना हद्दपार करण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे, पण त्यांना अचानक लष्करी विमानात हातकड्या घालून पाठवणे हा भारताचा अपमान आहे, भारतीयांच्या प्रतिष्ठेचा अपमान आहे, असंही थरुर म्हणाले.
अमेरिकेने 104 अवैध भारतीयांना पाठविले घरी
अमेरिकेने बुधवारी अवैध प्रवाशांविरुद्धच्या धोरणा अंतर्गत १०४ अवैध भारतीय स्थलांतरितांना जबरदस्तीने त्यांच्या देशातून हाकलून दिले. त्यांना घेऊन जाणारे अमेरिकन हवाई दलाचे विमान सी-१७ ग्लोबमास्टर २ वाजता अमृतसर येथील हवाई दलाच्या हवाई तळावर उतरले. या १०४ लोकांत त्यांची काही कुटुंबे आणि ८-१० वर्षे वयोगटातील मुलांचाही समावेश होता.
अमृतसर विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांची पडताळणी करण्यात आली. येथून, इमिग्रेशन आणि कस्टम्सकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अमेरिकन हवाई दलाचे विमान सुमारे साडेतीन तासांनंतर परतले. त्यानंतर पंजाबमधील लोकांना पोलिसांच्या वाहनांमधून त्यांच्या घरी पाठवण्यात आले. मात्र, हरयाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि चंडीगडमधील लोकांचे परतणे अद्याप बाकी आहे.