पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:47 IST2025-12-16T12:46:17+5:302025-12-16T12:47:20+5:30
SIR In West Bengal: भारतीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील एसआयआरच्या माध्यमातून नावं वगळलेल्या मतदारांची मसुदा यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमधील नोंदींनुसार पश्चिम बंगालमधील एकूण ५८ लाख मतदारांची नावं हटवण्यात आली आहेत.

पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर
भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने देशव्यापी मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून सध्या काही राज्यांमध्ये एसआयआरची अंमलबजावणी केली जात आहे. त्यापैकी पश्चिम बंगालमध्ये एसआयआरवरून अनेक आरोप प्रत्यारोप आणि वादविवाद होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगानेपश्चिम बंगालमधील एसआयआरच्या माध्यमातून नावं वगळलेल्या मतदारांची मसुदा यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमधील नोंदींनुसार पश्चिम बंगालमधील एकूण ५८ लाख मतदारांची नावं हटवण्यात आली आहेत.
निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये २०२५ च्या राज्य यादीत असलेल्या पण २०२६ च्या मसुद्यातून हटवण्यात आलेल्या मतदारांच्या नावांचा समावेश आहे. पश्चिम बंगालच्या एसआयआरची ही यादी सध्या निवडणूक आयोगाच्या ceowestbengal.wb.gov.in/asd_sir या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच निवडणूक आयोगाने ज्या मतदारांची नावं हटवण्यात आली आहेत, अशा मतदारांना आक्षेप घेण्याची संधी दिली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार गोळा न करता आलेले एसआयआरच्या एन्युमरेशन फॉर्मची संख्या ५८ लाखांपेक्षा अधिक आहे. हे फॉर्म संबंधित मतदार त्याने नोंद केलेल्या पत्त्यावर उपस्थित नसणे, कायमस्वरूपी स्थलांतरीत होणे, मृत होणे किंवा एकापेक्षा अधिक मतदारसंघात दुबार मतदार म्हणून नोंद झालेला असणे, या आधारावर हटवण्यात आले आहेत.
पश्चिम बंगालमधील एसआयआरबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार निवडणूक आयोगाने एसआयआरच्या मसुदा यादीतून एकूण ५८ लाख २० हजार ८९८ नावं हटवली आहेत. त्यापेकी २४ लाख १६ हजार ८५२ लोकांचा मृत्यू झाला आहे. १९ लाख ८८ हजार ७६ जण स्थलांतरीत झाले आहेत. १२ लाख २० हजार ३८ मतदार बेपत्ता असल्याचे दिसून आले. तर १ लाख ३८ हजार ३२८ मतदार हे दुबार मतदार असल्याचं निदर्शनास आलं. तर ५७ हजार ६०४ मतदार हे इतर श्रेणींमधील असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, नावं हटवण्यात आलेल्या मतदारांना त्यांचे आक्षेप नोंदवण्यासाठी १६ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ एवढा अवधी देण्यात आला आहे. या कालावधीत संबंधित मतदार हे फॉर्म ६ सोबत डिक्लरेशन फॉर्म आमि सपोर्टिंग डॉक्युमेंट जमा करू शकतील. दरम्यान, २९४ सदस्य संख्या असलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभेसाठी पुढील वर्षी मतदान होणार आहे.