तीन राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची नावं भाजपाकडून निश्चित? छत्तीसगडमध्ये समोर आणला नवा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 12:13 PM2023-12-05T12:13:02+5:302023-12-05T12:13:54+5:30

Assembly Election Result News: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा  निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता भाजपा या तीनही राज्यांत मुख्यमंत्रिपदासाठी कुणाची निवड करतो, याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे.

Names of Chief Ministers in three states confirmed by BJP? new face brought forward in Chhattisgarh | तीन राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची नावं भाजपाकडून निश्चित? छत्तीसगडमध्ये समोर आणला नवा चेहरा

तीन राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची नावं भाजपाकडून निश्चित? छत्तीसगडमध्ये समोर आणला नवा चेहरा

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा  निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता भाजपा या तीनही राज्यांत मुख्यमंत्रिपदासाठी कुणाची निवड करतो, याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार भाजपाच्या पक्षनेतृत्वाने तीन राज्यातील मुख्यमंत्रिपदासाठी नावं निश्चित केली आहेत. मात्र त्याबाबत अनेक तर्कवितर्कही लढवले जात आहेत. तसेच भविष्याचा विचार करून या तीनही राज्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत वसुंधरा राजे आघाडीवर आहेत. पक्ष पुन्हा एकदा त्यांना संधी देऊ शकतो. तर मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नावाला पहिली पसंती आहे, तसेच त्यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी संधी मिळेल, अशी शक्यता आहे. तर छत्तीसगडमध्ये केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांना मुख्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व नावांवर निर्णय झाला आहे. मात्र त्याबाबतची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुका विचारात घेऊन मुख्यमंत्र्यांची नावं निश्चित केली आहेत. तसेच पक्षश्रेष्ठींकडूनही या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तसेच ही नावं निश्चित करताना पक्षाचं भविष्यातील नेतृत्व विचारात घेऊन तीन राज्यांमध्ये उपमुख्यमंत्रीही नियुक्त केले जाणार आहेत. त्यानुसार मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्रिपदी कायम राहतील. मात्र भविष्यातील नेतृत्व तयार करण्यासाठी दोन उपमुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती करण्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल. तसेच इथेही दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केले जातील.  छत्तीसगडमध्ये रेणुका सिंह यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती होईल. तर पक्ष तिथे एखाद्या अनुभवी नेत्याला उपमुख्यमंत्रिपदी नियुक्त करेल.  

Web Title: Names of Chief Ministers in three states confirmed by BJP? new face brought forward in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.