नाव गांधीबाग पण म. गांधींचेच अस्तित्व नाही (भाग २)
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:05+5:302015-01-29T23:17:05+5:30
जो परिसर घाण आणि दुर्गंधीने भरला होता तेथे मनाला आल्हाद देणारे उद्यान तयार झाले. ज्या परिसरात नाक दाबून जावे लागत होते तेथे आता शांतता, स्वच्छता दिसायला लागली. गांधीजींना शांतता प्रिय होती. त्यामुळेच राष्ट्रसंतांनी या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. तेव्हापासून या उद्यानाला आणि परिसरालाही गांधीबाग असेच नाव अद्यापपर्यंत आहे. पण येथे अजूनही म. गांधींचा पुतळा स्थापन करण्यात आला नाही. महापालिकेचेही या बाबीकडे दुर्लक्ष झाले. गांधीजींच्या नावाने असणाऱ्या उद्यानात गांधीजींनाच शोधण्याची वेळ येथे आली आहे.

नाव गांधीबाग पण म. गांधींचेच अस्तित्व नाही (भाग २)
ज परिसर घाण आणि दुर्गंधीने भरला होता तेथे मनाला आल्हाद देणारे उद्यान तयार झाले. ज्या परिसरात नाक दाबून जावे लागत होते तेथे आता शांतता, स्वच्छता दिसायला लागली. गांधीजींना शांतता प्रिय होती. त्यामुळेच राष्ट्रसंतांनी या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. तेव्हापासून या उद्यानाला आणि परिसरालाही गांधीबाग असेच नाव अद्यापपर्यंत आहे. पण येथे अजूनही म. गांधींचा पुतळा स्थापन करण्यात आला नाही. महापालिकेचेही या बाबीकडे दुर्लक्ष झाले. गांधीजींच्या नावाने असणाऱ्या उद्यानात गांधीजींनाच शोधण्याची वेळ येथे आली आहे. गांधीबाग हे नामकरण करण्यापूर्वी राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने २९ जानेवारी १९५३ रोजी एका प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. आज गांधीजींची पुण्यतिथी आहे. पण गांधीबागेत मात्र म. गांधींचे अस्तित्व शोधूनही सापडत नाही. गांधीजींच्या पुण्यतिथीसाठी त्यावेळी प्रांतीय सरकार, सुधार प्रन्यास, सी. पी. अँड बेरार प्रॉपर्टीज कंपनी आणि सर्व धर्माच्या नागरिकांनी सहकार्य केले होते. टेलिफोन, पोस्ट ऑफिस, दिव्यांचे खांब, मॅजिस्ट्रेट निवास, कार्यकर्त्यांसाठी तंबू, राहुटी, उपयुक्त दुकाने, प्रदर्शन अशी व्यवस्था येथे सर्वांच्या सहकार्याने करण्यात आली. कार्यक्रमासाठी मान्यवरांचे संदेशही आले. यात सरदार वल्लभभाई पटेल, राजगोपालाचारी, कैलाशनाथ काटजू, काकासाहेब गाडगीळ, डॉ. पट्टाभिसीतारामय्या, स्वामी रामानंदतीर्थ, महावीर त्यागी, लोकनायक बापूजी अणे, जे. सी. कुमारप्पा, सेठ गोविंददास, राजकुमारी अमृत कौर आदींचा समावेश होता. राष्ट्रसंतांचे गुरु योगीराज स्वामी, सीतारामदास महाराज, संत दामोदरदास महाराज हे दोन आठवड्यांपूर्वी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. वामनराव लोहकरे, रघुनाथराव पत्तरकिने यांनीही यावेळी हजेरी लावली. प्रभातफेरी ज्या मार्गावरून नेण्यात आली, त्या मार्गावर सडासंमार्जन करण्यात आले, रांगोळ्या काढण्यात आल्या. प्रभातफेरीत सायकलस्वार स्वयंसेवक सहभागी झाले. स्वागतद्वार उभारण्यात आले, देवदेवतांच्या प्रतिमा लावण्यात आल्या, भगवे फेटे घातलेली भजन मंडळे राष्ट्रीय भजने सादर करीत होती. मुख्य रथावर स्वामी सीतारामदास महाराज आरुढ झाले आणि मागे म. गांधी यांचे भव्य तैलचित्र लावण्यात आले. ३० जानेवारी रोजी गांधी स्मृतिदिनानिमित्त मार्गदर्शक भाषणे, सामुदायिक ध्यान, व्यायाम, योगासने आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन तीन दिवस करण्यात आले होते. राष्ट्रसंतांच्या प्रेरणेने आणि म. गांधी यांच्या विचारातून या परिसराचा कायापालट झाला. पण या दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमा येथे उभारण्यात मात्र आमचाच नतद्रष्टपणा आड आला, असे म्हणावे लागेल.