नाव गांधीबाग पण म. गांधींचेच अस्तित्व नाही (भाग १)
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:14+5:302015-01-29T23:17:14+5:30
- आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी : गांधीजींच्या पुतळ्याचा महापालिकेला विसर

नाव गांधीबाग पण म. गांधींचेच अस्तित्व नाही (भाग १)
- ज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी : गांधीजींच्या पुतळ्याचा महापालिकेला विसर नागपूर : इतिहासाच्या पोटात अनेक सत्य दडली असतात पण प्रत्येकवेळी खरा इतिहास समोर येत नाही. माणसे संपतात, काळ बदलतो पण इतिहास निमुटपणे साऱ्या नोंदी करीत असतो. इतिहासाकडे गंभीरपणे पाहिले आणि सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर अनेक रंजक आणि थक्क करणाऱ्या नोंदी, आठवणी आपल्याला सापडतात आणि आतापर्यंत आपण समजत होतो, ते काही तरी वेगळे असल्याचाही प्रत्यय येतो. एखाद्या वस्तीचे, स्थळाचे, शहराचे नावही तसे का आहे, याचाही इतिहास असतोच पण आपण धावपळीच्या जीवनात इतके खोलात जात नाही. नागपुरातही सेंट्रल एव्हेन्युवर गांधीबाग उद्यान आहे. या उद्यानाचे नाव म. गांधींच्या नावाने गांधीबाग झाले आहे पण येथे गांधींजींचे अस्तित्वच दिसत नाही. या उद्यानाला गांधीबाग नाव पडण्यामागे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे यत्न आहेत. राष्ट्रसंतांनीच हे उद्यान उभारले, स्वच्छता केली आणि या उद्यानाला गांधीबाग असे नाव दिले. म. गांधी यांच्या नावाने असलेले हे उद्यान आहे पण येथे म. गांधी यांचा पुतळा उभारण्यात आलेला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म. गांधी यांचे अनुयायी होते. ३० जानेवारी १९५३ रोजी म. गांधी यांचा स्मृतिदिन नागपुरात मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला. राष्ट्रसंतांनीच हा कार्यक्रम आयोजित केला होता. राष्ट्रसंतांनी गांधीजींची पुण्यतिथी त्यांच्या विचारांवर अमल करून साजरी करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी तत्कालीन लेंडी तलाव परिसराची निवड केली. या परिसरात त्यावेळी खूप घाण होती आणि तेथे छोटासा तलाव होता. लोक येथे शौचासाठी येत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, अनारोग्य पसरले होते. म. गांधी स्वच्छतेचे पुजारी होते. परिसर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्यासाठी त्यांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या याच विचाराने प्रभावित होऊन राष्ट्रसंतांनी लेंडी तलाव परिसराची निवड म. गांधींच्या पुण्यतिथीसाठी केली आणि आपल्या शिष्यपरिवारासह या तलावाची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रसंतांनी १५०० स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा तलाव परिसर स्वच्छ केला. यासाठी सर्व नागरिकांनी येथे श्रमदान केले. त्यांनी दलदलीने आणि घाणीने भरलेला हा तलाव बुजविला आणि परिसर स्वच्छ केला. तेथे वृक्षांची लागवड केली आणि उद्यान तयार झाले.