मोदी सरकारला राम-राम केलेल्या चंद्राबाबू नायडूंशी शरद पवारांचं गुफ्तगू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 13:07 IST2018-04-03T12:49:09+5:302018-04-03T13:07:14+5:30
सध्या राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधी महाआघाडी स्थापन करण्याचे विरोधकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

मोदी सरकारला राम-राम केलेल्या चंद्राबाबू नायडूंशी शरद पवारांचं गुफ्तगू
नवी दिल्ली: आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा देण्याच्या मागणीवरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (रालोआ) बाहेर पडलेले तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेतली. संसदेत या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांशी काहीवेळ चर्चा केली. त्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सध्या राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधी महाआघाडी स्थापन करण्याचे विरोधकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मध्यंतरी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 19 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यानंतर चंद्राबाबुंच्या टीडीपी पक्षाने एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. याशिवाय, शिवसेनाही सातत्याने भाजपाविरोधी भूमिका घेण्यातच धन्यता मानत आहे. त्यामुळे 2019 पर्यंत भाजपाविरोधी महाआघाडीची मोट बांधली जाण्याच्या शक्यता वाढल्या होत्या. त्यात आता चंद्राबाबू आणि पवारांची भेट झाल्याने पुन्हा नव्या चर्चेला सुरूवात झाली आहे.
Delhi: Andhra Pradesh CM N Chandrababu Naidu met NCP Chief Sharad Pawar in Parliament. pic.twitter.com/Om5aiihByn
— ANI (@ANI) April 3, 2018