Vivek Vihar Murder Case: गेल्या आठवड्यात दिल्लीच्या विवेक विहार परिसरातल्या एका घरातून रक्त वाहू लागल्याने खळबळ उडाली होती. विवेक विहारमधील सत्यम एन्क्लेव्हमध्ये असलेल्या एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घराला बाहेरून कुलूप होते पण मागच्या दारातून रक्त वाहत होते. दरवाजा उघडल्यानंतर पोलिसांना ३५ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह बेडीमध्ये लपवलेला आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी घरमालकाला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता याप्रकरणाचा उलघडा झाला असून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आलं आहे.
विवेक विहार परिसरात एका महिलेच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना गूढ उकलण्यात यश आलं आहे. पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणामध्ये घरमालक विवेकानंद मिश्राला ताब्यात घेतलं होतं. ३५ वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात महिला भाड्याच्या घरात बेडमध्ये मृतावस्थेत आढळली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये घरमालकासह महिलेच्या पतीचा देखील समावेश आहे. या महिलेचा पती आणि त्याच्या मित्राने हत्येनंतर मृतदेह लपवण्यात मदत केली होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, महिलेने तिचा पती, त्याचा मित्र आणि त्यांच्या घरमालकाला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. पोलिसांनी घरमालकाला आधीच अटक केली होती. २८ मार्च रोजी घरातून दुर्गंधी येत असल्याने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घराचे कुलूप उघडून आत प्रवेश केला होता. पोलिसांना फ्लॅटमध्ये एका ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला. पोलिसांनी तपासाच्या सुरुवातीला बेपत्ता असलेल्या घरमालकाचा शोध सुरु केला आणि त्याला ताब्यात घेतलं. त्याने दिलेल्या माहितीवरुन महिलेचा पती आणि दुसऱ्या मित्राला अटक करण्यात आली.
महिलेला त्यांच्यामधील संबंधाबद्दल कळलं होतं त्यामुळेच तिची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. महिला आणि तिचा पती लुधियानाहून दिल्लीत आले होते. गेल्या रविवारी तिला जाग आली तेव्हा तिचा पती शेजारी नसल्याचे तिला कळलं. त्यामुळे तिने शोधाशोध सुरु केली. आवाज आल्याने तिने खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा तिला धक्का बसला. खोलीत घरमालक, तिचा पती आणि मित्र यांची नको त्या अवस्थेत दिसले. तिघांनीही महिलेला पाहिलं आणि त्यांनी तिचा गळा दाबून तिला मारहाण करुन संपवून टाकलं.
हत्येनंतर घरमालकाने रसायनांचा वापर करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया ऑनलाईन सर्च केली होती. आरोपीने घराच्या शेजारी असणारी उघडी गटारंही पाहून ठेवली होती. यावरुनच ते मृतदेहाची विल्हेवाट लावणार होते हे समोर आलं. पोलिसांनी तिन्ही आरोपींनी अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.