उत्तर प्रदेशमधील चंदौलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पत्नीच्या जाचामुळे त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने स्वत:वर गोळ्या झाडून घेत जीवन संपवले. तत्पूर्वी या व्यक्तीने आपला व्हिडीओ व्हायरल केला. त्यामध्ये त्याने त्याची पत्नी बाहेरच्या लोकांना बोलावून घरी ठेवते असा आरोप केला.
ही घटना सदर कोतवाली क्षेत्रातील केशवपूर गावामध्ये घडली आहे. येथील ४५ वर्षीय मनोज कुमार याने कौटुंबिक कलहामुळे स्वत:वर गोळ्या झाडून घेत जीवन संपवले. या घटनेनंतर पोलीस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत मनोज कुमार याला दोन मुली असल्याची माहितीही समोर आली आहे.
जीवन संपवण्यापूर्वी मनोज याने एक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामध्ये मनोजने पत्नी आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. तो या व्हिडीओमध्ये म्हणाला की, माझी पती घरामध्ये बाहेरील लोकांना बोलावते. असं न करण्याबाबत वारंवार समजावल्यानंतरही तिने माझं ऐकलं नाही. यावेळी सासरे घुरन प्रसाद यांचं नाव घेत तो म्हणाला की, त्यांची मुलगी जिथे जाते तिथे अशांतता निर्माण होते. पत्नीमुळे माझ्या मुलीसुद्धा माझ्यावर नाराज होऊन विरोधात गेल्या, असेही तो या व्हिडीओमध्ये म्हणाला.
याबाबत माहिती देताना अॅडिशनल एसपी अन्नत चंद्रशेखर यांनी सांगितले की, या प्रकरणी तपास सुरू आहे. तसेच सर्व पैलूंची पडताळणी केली जात आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.