बेळगाव : कर्नाटकात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये मोठा बदल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे. सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रीपदापासून लांब राहतील आणि त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपद दिले जाईल, अशी चर्चा सुरु आहे. यादरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचे विधान समोर आले आहे.
डीके शिवकुमार यांनी सोमवारी सांगितले की, आपले पक्षातील कोणाशीही मतभेद नाहीत. आपल्याला कोणत्याही वादात ओढू नका, असे आवाहन त्यांनी प्रसारमाध्यमांना केले. तसेच, डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केले की, त्यांची एकमेव जबाबदारी पक्ष आणि सरकार वाचवणे आहे.
पत्रकारांशी बोलताना डीके शिवकुमार म्हणाले, "माझी एकमेव जबाबदारी पक्ष वाचवणे आणि सरकार स्थिर ठेवणे आहे. याशिवाय, माझ्यावर दुसरी कोणतीही जबाबदारी नाही. माझे कोणाशीही वैयक्तिक मतभेद नाहीत. कृपया माझे नाव कोणत्याही वादात किंवा अनावश्यक चर्चेत ओढू नका."
दरम्यान, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीसाठी पूर्णवेळ अध्यक्षाची मागणी काही मंत्री आणि आमदारांनी केली असताना डीके शिवकुमार यांचे हे विधान आले आहे. कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अलिकडेच असे म्हटले होते की, पक्षातील महत्त्वाची पदे भूषवताना मंत्री योग्यरित्या काम करू शकत नाहीत. यावर डीके शिवकुमार म्हणाले की, आपण पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या अंतर्गत मतभेदांच्या पलीकडे जाऊन काम करत आहोत.
डीके शिवकुमार म्हणाले, "हा पक्ष, हायकमांड आणि माझ्यातील प्रश्न आहे. कृपया पक्षात कोणत्याही प्रकारचा संघर्ष किंवा बनावट वाद निर्माण करू नका." तसेच, काँग्रेस पक्षात काही अंतर्गत मतभेद आहेत का? असे विचारले असता ते म्हणाले, "पक्षात कोणताही दुरावा नाही. मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे आणि सर्व पक्ष कार्यकर्त्यांशी समान वागतो. सर्वांना सोबत घेऊन जाणे हे माझे कर्तव्य आहे."