Indonesian President: भारताने रविवारी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. या दिवसाला खास बनवण्यासाठी कर्तव्य पथावर आयोजित केलेल्या भव्य परेडने देशवासियांना अभिमानाने आणि उत्साहाने भरून टाकले. यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात केली. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे देखील उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रात्री त्यांच्यासाठी जेवणाचे आयोजन केले होते. यावेळी सुबियांतो यांनी केलेल्या एका विधानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वांना हसू फुटलं.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्याशी हैदराबाद हाऊस येथे विशेष भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली, ज्यात संरक्षण उत्पादन, पुरवठा साखळी, सागरी सुरक्षा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी संध्याकाळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्यासाठी जेवणाचे आयोजन केले होते. या डिनर कार्यक्रमादरम्यान इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी असे काही म्हटलं ज्यामुळे पंतप्रधान मोदींसह सर्व मान्यवर मोठ्याने हसले.
भारतासोबतच्या आपल्या नवीन संबंधांबद्दल विनोदीपणे बोलताना राष्ट्रपती सुबियांतो यांनी डीएनए चाचण्यांवरून माझे पूर्वज भारतीय असल्याचे दिसून आल्याचं म्हटलं. इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील प्राचीन संबंधांबद्दलही बोलताना म्हटलं की, आपल्या भाषेतील अनेक महत्त्वाचे शब्द संस्कृत भाषेतून आले आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
"भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंधांचा इतिहास खूप जुना आहे. दोन्ही देशांतील संस्कृतींचा संबंध इतका आहे की आमच्या भाषेतील अनेक महत्त्वाचे शब्द संस्कृत भाषेतील आहेत. आपली अनेक नावे संस्कृत भाषेतील आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातही प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. आपली जनुके सुद्धा सारखीच असतात. काही आठवड्यांपूर्वी मी माझी जेनेटिक्स सीक्वेंसिंग आणि डीएनए चाचणी केली. माझा डीएनए भारतीय असल्याचे मला सांगण्यात आले. भारतीय संगीत ऐकताच मी नाचू लागतो हे सर्वांनाच माहीत आहे," असं इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी सांगितलं.
"मला येथे (भारत) आल्याचा अभिमान वाटतो. मी काही स्वार्थी राजकारणी नाही, चांगला मुत्सद्दीही नाही. मी जे काही बोलतो ते मनापासून सांगतो. मला इथे येऊन काही दिवस झाले आहेत, पण मी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातून आणि त्यांच्या समर्पणातून खूप काही शिकलो आहे. गरीबी निर्मूलन आणि दुर्बल घटकांना मदत करण्याचे त्यांचे काम आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, " असं राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी म्हटलं.
दरम्यान, यावेळी इंडोनेशियाने भारताच्या समृद्धी आणि शांततेसाठी शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात भारत आणि इंडोनेशियामधील संबंध अधिक दृढ होतील अशी आशा व्यक्त केली.