"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 21:53 IST2025-09-24T21:53:01+5:302025-09-24T21:53:52+5:30
अयोध्येत राहणाऱ्या मुस्लिमांना येथे राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत अयोध्येतून बाहेर काढू आणि नंतर उत्साहाने दिवाळी साजरी करू."

"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते तथा माजी खासदार विनय कटियार यांनी बुधवारी (24 सप्टेंबर 2025), मुस्लिमांनी लवकरात लवकर अयोध्या सोडावी. या मंदिरनगरीत कोणत्याही मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. स्थानिक प्रशासनाने नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) नसल्याने धन्नीपूर मशिदीची योजना नाकारल्याच्या प्रश्नावर, त्यांनी हे विधान केले आहे.
मुस्लिमांचा अयोध्येशी काहीही संबंध नाही -
राम जन्मभूमी आंदोलनाशी संबंधित असलेले कटियार म्हणाले, "अयोध्येत बाबरी मशिदीच्या बदल्यात अन्य मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही. अयोध्येत राहणाऱ्या मुस्लिमांना येथे राहण्याचा कोणताही अधिकार नाही. आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत अयोध्येतून बाहेर काढू आणि नंतर उत्साहाने दिवाळी साजरी करू." एवढेच नाही तर, "मुस्लिमांचा अयोध्येशी काहीही संबंध नाही. त्यांनी हा जिल्हा रिकामा करून शरयू नदीच्या पार जावे," असेही कटियार यांनी म्हटले आहे.
कटियार यांचा परिचय -
विनय कटियार हे राम मंदिर आंदोलनाचा एक मुख्य चेहरा राहिले आहेत. बजरंग दलाचे संस्थापक म्हणून त्यांचे कारसेवकांना संघटित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी 1984 मध्ये त्यांनी विश्व हिंदू परिषदेची (विहिंप) युवा शाखा असलेल्या बजरंग दलाची स्थापना केली, ज्याने अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली.
भाजपने कटियार यांना 1991, 1996 आणि 1999 मध्ये अयोध्या (तत्कालीन फैजाबाद) मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती आणि ते खासदारही झाले होते. याशिवाय, 2006 ते 2012 आणि 2012 ते 2018 या काळात ते भाजपकडून राज्यसभेचे खासदार होते.