पश्चिम बंगालमधीलमुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारी नवीन वक्फ (दुरुस्ती) कायद्याविरुद्धच्या निदर्शनांना हिंसक वळण लागलं आणि त्यात अनेक कुटुंबातील लोकांना आपला जीव गमवावा लागला. परिस्थिती अशी होती की, या हिंसाचाराच्या वेळी लोकांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांनी अंगावर काटा आणणाऱ्या, थरकाप उडवणाऱ्या घटनांबद्दल माहिती दिली आहे.
हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आणि परिसरात अजुनही तणावाचं वातावरण आहे. ३२ वर्षीय पिंकी दासने हल्ल्यादरम्यान असलेल्या भीषण परिस्थितीबद्दल सांगितलं. "हल्लेखोर आले, हल्ला सुरू झाल्यानंतर आम्ही पोलिसांना फोन करत होतो. पण आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. माझे पती आणि सासरे यांची हत्या केली गेली. त्यांचे मृतदेह आमच्या घराजवळ तीन तास पडले होते."
“आमच्या घरावर चार वेळा हल्ला”
“माझे पती चंदन दास (४०) आणि सासरे हरगोविंद दास (७०) यांना हिंसक जमावाने क्रूरपणे टार्गेट केलं. हल्लेखोर घरात घुसले आणि तोडफोड केली. घरांवर बॉम्ब आणि दगड फेकत होते. त्यांनी आमच्या घरावर चार वेळा हल्ला केला. लाकडी दरवाजा तोडला. अशी परिस्थिती फक्त मुर्शिदाबादमध्येच नाही तर इतर काही भागातही दिसून आली” असं पिंकीने म्हटलं आहे.
सेलिमाने २१ वर्षीय नवरा गमावला
काशिमनगरच्या गाजीपूर भागात राहणाऱ्या सेलिमाने तिचा २१ वर्षीय नवरा गमावला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. तिला एक लहान बाळ आहे. शाहिद शेख यांनी "मृत्यूनंतर, कोणताही नेता किंवा पोलीस आमच्या घरी आले नाही" असं म्हटलं आहे. हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि १५० जणांना अटक करण्यात आली आहे.