मुरबाडमध्ये पाणीटंचाई, अधिकारी मात्र गायब
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:14+5:302015-03-20T22:40:14+5:30
टोकावडे : उन्हाचा तडाखा सुरू झाला असून वाड्यावस्त्यांवर पाणीसमस्या निर्माण झाली असताना, पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ज्या विभागाच्या खांद्यावर आहे, त्या विभागाचा एकही कर्मचारी आपल्या कार्यालयात सापडत नसल्याने तक्रार घेऊन येणार्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.

मुरबाडमध्ये पाणीटंचाई, अधिकारी मात्र गायब
ट कावडे : उन्हाचा तडाखा सुरू झाला असून वाड्यावस्त्यांवर पाणीसमस्या निर्माण झाली असताना, पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ज्या विभागाच्या खांद्यावर आहे, त्या विभागाचा एकही कर्मचारी आपल्या कार्यालयात सापडत नसल्याने तक्रार घेऊन येणार्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. मुरबाड तालुक्यात झाडघर पठार, बांगरखाडी, बोरवाडी, मोरोशी, सावर्णे, कुंभाळा, मोधळवाडी, लाकूडपाडा अशा अनेक वाड्यापाड्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांतील पाणीसमस्या दूर करण्यासाठी १७९ पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. मात्र, आठ वर्षांहून अधिक काळ लोटला तरी एकही योजना पूर्ण न झाल्याने व आलेला निधी खर्च झाल्याने संपूर्ण तालुक्याला याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक गावांत हातपंप असून पाण्याची पातळी खाली गेल्याने व काही हातपंप बिघडल्याने याबाबतची तक्रार देण्यासाठी नागरिक पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागात हेलपाटे मारून हैराण झाले आहेत. परंतु, या तक्रारींची दखल घेण्यासाठी या कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी नसल्याने त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. या वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी तहसीलदार कार्यालयाकडे केली असता या कार्यालयाने ही जबाबदारी पंचायत समितीची असल्याचे सांगून हात वर केले आहेत. तर पंचायत समितीने ग्रामपंचायत ठरावाची मागणी केली आहे. ही प्रक्रियांची फेरी पूर्ण करता-करता रहिवाशांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संतापाची भावना निर्माण झाली आहे. (वार्ताहर)