नाईटलाइफंमुळे मुंबई चोवीस तास उघडी राहणार, पण सुरक्षेच्या प्रश्नाचे काय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 06:40 AM2020-01-21T06:40:59+5:302020-01-21T06:41:58+5:30

मुंबई हे कायम अतिरेक्यांच्या निशाण्यावर राहिलेले शहर. ते २४ तास सुरू राहिल्यास सुरक्षेवरील ताण अधिकच वाढेल. त्यावर उपाय म्हणून जागतिक स्तरावर कोणती व्यवस्था केली जाते त्याचा अभ्यास यानिमित्ताने करण्याची गरज आहे.

Mumbai will be open 24 hours due to nightlife | नाईटलाइफंमुळे मुंबई चोवीस तास उघडी राहणार, पण सुरक्षेच्या प्रश्नाचे काय

नाईटलाइफंमुळे मुंबई चोवीस तास उघडी राहणार, पण सुरक्षेच्या प्रश्नाचे काय

Next

मुंबई मध्यरात्रीनंतरही सुरू राहावी आणि त्यातून मुंबईच्या आंतरराष्ट्रीयपणाला सध्या येत असलेल्या मर्यादा दूर व्हाव्यात, असा मतप्रवाह मानणाऱ्यांनी मुंबईच्या नाइट लाइफला हिरवा कंदील दिला आहे. त्यावरून सध्या थोडी वावटळ उठली आहे. महाराष्टÑापुढे इतर मोठे प्रश्न आ वासून उभे असताना ‘नाइट लाइफ’सारख्या मनोेरंजनाकडे झुकलेल्या विषयाचा अट्टहास का, आपली सुरक्षाव्यवस्था तेवढी सक्षम आहे का, २४ तास मुंबई सुरू राहिल्याने असा कोणता मोठा आर्थिक फायदा होणार आहे, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या प्रश्नांमध्ये तथ्य आहेच. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई आदी महत्त्वाच्या समस्या समोर असताना सरकार मुंबईतील रात्रीच्या सरबराईला इतके महत्त्व का देत आहे, अशी विचारणा होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे मुंबईच्या रात्र जीवनाची आवश्यकता हा मुद्दा सातत्याने चर्चेत येणारच आहे. वास्तविक मुंबई रात्रीही सुरू असते. एरव्ही मुंबईत सुरू असलेल्या सगळ्या अत्यावश्यक सेवा, निरनिराळ्या देशी-परदेशी कंपन्यांची कॉल सेंटर्स २४ तास सुरू राहण्यासाठी असंख्य हात राबत असतात. कधीही न झोपणारे शहर म्हणूनही मुंबईची ओळख आहेच. येथे दिवसाचे चोवीस तास वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांची कामेधामे सुरू असतात. फक्त रेल्वेसेवा मध्यरात्री साडेतीन तास बंद राहते. मात्र नाइट लाइफमुळे मध्यरात्री काही काळ थबकणारी मुंबईही कार्यरत राहील, ही रात्र जीवनाची मूळ कल्पना.

अर्थात, ती टप्प्याटप्प्याने राबविली जाईल. सुरुवातीला बीकेसी, काळाघोडा, नरीमन पॉइंटच्या अनिवासी भागात व्यावसायिक आस्थापने सुरू राहतील. तेथील अनुभव, व्यवस्थापन लक्षात घेऊन मग मुंबईच्या इतर भागात किंवा इतर शहरांतही ही योजना लागू करण्याचा मानस आहे. यात पहिला प्रश्न निर्माण होईल तो अर्थातच सुरक्षेचा. मुंबई हे नेहमी अतिरेक्यांच्या निशाण्यावर राहिलेले शहर आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर अखंड ताण असतो. २४ तास सुरू राहिलेल्या शहरामुळे तो अधिक वाढेल. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी जागतिक स्तरावर कोणती व्यवस्था केली जाते तिचा अभ्यास करून परिस्थितीनुरूप अंमलबजावणी करण्याची गरज आहे आणि तशी व्यवस्था वर्षाचे ३६५ दिवस करावी लागेल. मुंबईतील शेवटच्या लोकलमधूनही महिलांचा दडपणाविना प्रवास सुरू असतो. इतर महानगरांच्या तुलनेने या मायानगरीत महिला अधिक सुरक्षित आहेत हे विविध सर्वेक्षणातून यापूर्वीही सिद्ध झाले आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा बाऊ करण्यात तसा अर्थ नाही. तरीही अपवादात्मक घटनादेखील घडू नयेत याची काळजी घेतली जायला हवी. सुरक्षा यंत्रणा, पालिका प्रशासन आणि व्यावसायिक यांनी एकत्र येऊन यासंदर्भातील निर्णय विचारपूर्वक घ्यायला हवा. जगभरातील मोठमोठ्या शहरात नाइट लाइफ सुरू आहे. परंतु नाइट लाइफ म्हणजे केवळ पब आणि दारूची दुकाने उघडी राहतील असे मानायचे कारण नाही आणि त्याकडे केवळ नकारात्मक दृष्टीने पाहता कामा नये.

मुंबईतील अनेक उपनगरात रात्रीची म्हणून खाद्य केंद्रे गेली कित्येक वर्षे प्रसिद्ध आहेत. कोणत्याही परवान्याविना ती बिनबोभाट सुरू आहेत. रात्रीच्या या खाद्य संस्कृतीचा मनमुराद आनंद मुंबईकर घेत असतात. नाइट लाइफमुळे मनोरंजनाची ठिकाणे, मॉल्स, तसेच काही खाद्य केंदे्र अनिवासी जागेत रात्रभर सुरू राहिल्यास तेथे रोजगारनिर्मितीही होईल. आज या महानगरात हाताला काम मिळावे, म्हणून लाखो बेरोजगार वणवण भटकत असतात. अशा वेळी रात्रपाळी सुरू झाल्यास त्यांना नक्कीच फायदा होईल. पर्यटनस्नेही म्हणूनही रात्रीच्या मुंबईची योजना उपयोगाची ठरेल. मुंबईतल्या सिनेसृष्टीचे सगळ्यांना आकर्षण आहे. त्या ओढीने पर्यटक येतात, पण त्यांना ही मोहमयी दुनिया दाखवण्यासाठीची यंत्रणा फार तोकडी आहे. यानिमित्ताने ती अधिक मजबूत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी लागेल. या नवीन धोरणामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचे एक पाऊल पुढे पडत असेल, तर त्याचे मोकळ्या मनाने स्वागत करायला हवे.

Web Title: Mumbai will be open 24 hours due to nightlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.