Mumbai: भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मुंबईत हाय अलर्ट; किनारपट्टी आणि प्रमुख भागात सुरक्षा कडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 13:45 IST2025-05-09T13:44:44+5:302025-05-09T13:45:20+5:30
India-Pakistan Tension: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस पथक समुद्रकिनाऱ्यावर सक्रियपणे लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे.

Mumbai: भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मुंबईत हाय अलर्ट; किनारपट्टी आणि प्रमुख भागात सुरक्षा कडक
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतहाय अलर्ट घोषित करण्यात आले. संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी शहराच्या किनारपट्टीवर गस्त वाढवली आहे. तसेच नागरिकांना पुढील काही दिवस आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले.
मुंबईतील अनेक ठिकाणी विशेषतः दादर चौपाटीसारख्या परिसरात पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सकाळी पोलिसांनी नागरिकांना समुद्रकिनारा रिकामा करण्यास सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांचे एक पथक समुद्रकिनाऱ्यावर सक्रियपणे लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे.
Mumbai: In response to growing tensions between India and Pakistan, Mumbai Police has heightened security along coastal areas. People at Dadar Chowpatty are being asked to leave the coastline for safety reasons pic.twitter.com/BiE44waIPp
— IANS (@ians_india) May 9, 2025
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईतील त्यांच्या वर्षा बंगल्यातील सरकारी निवासस्थानी उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहून सुरक्षा उपाययोजना आखतील. दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी शुक्रवारी राज्यात सुरक्षा बळकट करण्यासाठी अशाच प्रकारची आढावा बैठक घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त सतर्क राहण्याचे आणि सुरक्षा पायाभूत सुविधांमध्ये जलद सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
संभाव्य हवाई हल्ले आणि ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी गुरुवारी रात्री देशभरातील अनेक ठिकाणी ब्लॅकआउट लागू करण्यात आले. भारतीय सैन्याने एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमावर भारतीय हवाई क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५० हून अधिक पाकिस्तानी ड्रोनना निष्क्रिय केले.