मुलाखतीसाठी मुकेश सिंहला मिळाले ४० हजार रुपये
By Admin | Updated: March 6, 2015 11:02 IST2015-03-06T10:58:54+5:302015-03-06T11:02:21+5:30
निर्भया प्रकरणावरील माहितीपटात मुलाखत देण्यासाठी मुकेश सिंह या नराधमाने डॉक्यूमेंटरीच्या निर्मात्यांकडून ४० हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे.

मुलाखतीसाठी मुकेश सिंहला मिळाले ४० हजार रुपये
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - निर्भया प्रकरणावरील माहितीपटात मुलाखत देण्यासाठी मुकेश सिंह या नराधमाने डॉक्यूमेंटरीच्या निर्मात्यांकडून ४० हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे. तिहार कारागृह प्रशासनाने केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली असली तरी अद्याप या वृत्ताला दुजोरा देणारा पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावरील डॉक्यूमेंटरी हा वादाचा विषय ठरत असून तिहार तुरुंगात शिक्षा भोगणारा मुकेश सिंहची मुलाखत कशी घेतली गेली असा सवाल उपस्थित होत आहे. याप्रकरणी तिहार तुरुंग प्रशासनाने चौकशीही सुरु केली आहे. २०१३ मध्ये बीबीसीच्या पत्रकार लेस्ली उडवीन यांनी मुलाखतीसाठी अथक प्रयत्न केले. अखेर गृहखाते व तिहार जेलच्या अधीक्षकांकडून परवानगी मिळवण्यात उडवीन यशस्वी ठरल्या. मुकेश सिंहची मुलाखत घेण्यासाठी लेस्ली उडवीन यांना खुल्लर नामक व्यक्तीने मदत केल्याचे स्थानिक वृ्त्तपत्राने म्हटले आहे. मुलाखतीसाठी मुकेश सिंहकडून सुरुवातीला २ लाख रुपयांची मागणी केली गेली. पण ही रक्कम जास्त असल्याचे सांगत उडवीन यांनी मुकेश सिंहला ४० हजार रुपये द्यायची तयारी दर्शवली. मुकेशही यासाठी तयार झाला व शेवटी ४० हजार रुपये त्याला देण्यात आले. मात्र मुकेश व त्याच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यामध्ये या व्यवहाराची नोंद आढळलेली नाही. त्यामुळे हा व्यवहार रोख झाला असावा अशी चर्चा आहे.