"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 15:51 IST2025-09-12T15:49:56+5:302025-09-12T15:51:47+5:30
बिहार विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असून नोव्हेंबर २०२५ मध्ये २४३ जागांवर निवडणुका होण्याची शक्यता आहे.

"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
बिहार विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असून नोव्हेंबर २०२५ मध्ये २४३ जागांवर निवडणुका होण्याची शक्यता आहे. यावेळीही एनडीए विरुद्ध महाआघाडी यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारची राजधानी पाटणा येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात विकासशील इंसान पार्टीचे नेते मुकेश सहनी यांनी मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरबाबत भाष्य केले. मुकेश साहनी यांचा पक्ष महाआघाडीचा भाग असून राज्यातील निवडणुकीसाठी पुरेशा जागा हव्या आहेत, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. तसेच त्यांना भविष्यात मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपकडून ऑफर येत आहेत, असेही ते म्हणाले.
मुकेश साहनी म्हणाले की, "आम्ही राज्यात जेव्हा जेव्हा पोटनिवडणुका लढवल्या आहेत, तेव्हा आम्ही स्वतःहून १४-१५ टक्के मते मिळवली आहेत. आम्ही काँग्रेसला आमचा मोठा भाऊ बनवून निवडणुका लढवत आहोत. तेजस्वी यादव हा सर्वात मोठा पक्ष आहे. आम्हाला आमचा पक्ष मोठा करायचा आहे, त्यासाठी आम्हाला जास्त जागेवर निवडणूक लढण्याची संधी मिळावी." मुकेश साहनी हे किती जागांवर निवडणूक लढवतील याबद्दल त्यांनी नेमका आकडा सांगितला नाही. पंरतु, ते जास्त जागा लढवतील, असे म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे, काँग्रेस मुकेश साहनींपेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवेल, यात काही शंका नाही.
पुढे मुकेश साहनी म्हणाले की, "मी बिहारमध्ये निवडणुक लढवून सिद्ध केलं की, मच्छीमाराचा मुलगा फक्त मासे पकडत नाही, तो आमदार, मुख्यमंत्री आणि मंत्री देखील बनतो. मी संघर्ष केला आणि ४ आमदार निवडून आणले. भाजपने आमचे चार आमदार तोडले. त्यांना मुकेश सहनींशी काहीही अडचण नाही. आजही ते आम्हाला त्यांच्यासोबत येण्याची ऑफर देतात, भविष्यात आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री बनवू, असेही ते आश्वासन देतात."
मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर त्यांनी काय म्हटले?
महाआघाडीत मुकेश साहनी देखील मुख्यमंत्री होऊ शकतात का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, "मी स्वीकारले आहे की, आमच्या आघाडीचा नेता तेजस्वी असेल. मी निश्चितपणे स्वप्न पाहिले आहे की, येणाऱ्या काळात निषाद मल्लाहचा मुलगा मुख्यमंत्री होईल. सध्या आम्ही स्वीकारले आहे की, आमचा धाकटा भाऊ तेजस्वी यादव मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसेल."