एमटीएनएलचे जानेवारीचे बहुप्रतिक्षीत वेतन गुरुवारी 21 फेब्रुवारीला होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 15:19 IST2019-02-19T15:19:15+5:302019-02-19T15:19:41+5:30
- खलील गिरकर मुंबई - महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ( एमटीएनएल ) च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे ...

एमटीएनएलचे जानेवारीचे बहुप्रतिक्षीत वेतन गुरुवारी 21 फेब्रुवारीला होणार
- खलील गिरकर
मुंबई - महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन अखेर गुरुवारी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु होत आला तरी जानेवारी महिन्याचे वेतन झालेले नसल्याने एमटीएमएल कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये संताप पसरला होता. नेमके कधी वेतन होणार याबाबत अनिश्चितता होती मात्र आता 21 फेब्रुवारीला वेतन होणार असल्याचे निश्चित झाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
गेल्या काही महिन्यात एमटीएनएलला वेतनासाठी बँकांकडे हात पसरण्याची वेळ आली होती. बँकांकडून कर्ज घेऊन वेतन दिले जात होते. मात्र एमटीएनएल वरील कर्जाचा बोझा सुमारे वीस हजार कोटी पर्यंत पोचल्याने आता बँकांनी हात वर केले व कर्ज देण्यास नकार दिल्याने वेतन रखडले होते. मुंबई व दिल्ली मध्ये एमटीएनएलचे सुमारे तेवीस हजार कर्मचारी व अधिकारी असून त्यांच्या वेतनासाठी सुमारे एकशे साठ कोटी रुपयांची दरमहिन्याला गरज भासते.
एमटीएनएलच सरकारकडील काही प्रलंबित देणी मिळाल्याने हे वेतन काढणे शक्य झाल्याची माहिती एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.
21फेब्रुवारीला दिल्लीत डिजिटल कम्युनिकेशन कमिशन ची बैठक होणार आहे त्यामध्ये
एमटीएनएलची पुनर्रचना करण्याचा मुख्य मुद्दा आहे. त्यावर चर्चा होईल व त्यामध्ये ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोट
वेतन वेळेवर होत नसल्याने एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना प्रचंड आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या महत्त्वपूर्ण प्रश्नावर
कायमस्वरुपी मार्ग काढण्याची गरज आहे.
सरकारने गाभीर्याने याकडे लक्ष देऊन हा अन्याय दूर करण्याची आवश्यकता आहे.
दिलीप जाधव, सरचिटणीस, महानगर टेलिफोन निगम कामगार संघटना