‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी पहिल्याच दिवशी दाखवली एकजूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 05:29 IST2024-06-25T05:29:01+5:302024-06-25T05:29:41+5:30
लोकसभेत राज्यघटनेच्या प्रती घेऊन हजर, खासदारांना शपथ

‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी पहिल्याच दिवशी दाखवली एकजूट
आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या अनेक घटक पक्षांचे नेते १८ व्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी राज्यघटनेची प्रत घेऊन सभागृहात पोहोचले.
कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी खासदार संसदेच्या संकुलात जमले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. ‘आम्ही राज्यघटनेचे रक्षण करू’ आणि ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणा दिल्या. यावेळी सोनिया गांधी, खरगे, राहुल गांधी आणि द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीतील इतर अनेक घटक पक्षांचे खासदार उपस्थित होते. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी विरोधी खासदारांच्या घोषणाबाजीचा व्हिडीओ शेअर केला आणि आम्ही एकजूट आहोत असे पोस्ट केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या समस्या, आव्हाने, आशा आणि आकांक्षा यांना संसदेत मांडण्याच्या नव्या संकल्पाने ‘इंडिया’ आघाडी १८ व्या लोकसभेत प्रवेश करत आहे, असे ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी राज्यघटनेला मोठा मुद्दा बनवला होता.