MP Accident :मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील बिलखियारिया परिसरात ट्रक आणि डंपरचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर जखमी क्लिनरला मदत करण्याऐवजी स्थानिकांनी ट्रकमधून पडलेले मोहरीच्या तेलाचे बॅरल लुटले.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक राजस्थानहून नागपूरला जात असताना हा अपघात झाला. ट्रकमध्ये मोहरीच्या तेलाचे बॉक्स भरलेले होते. चालकाला झोप लागल्याने बिलखियारिया पोलीस स्टेशन परिसरात ट्रकची समोर उभ्या असलेल्या डंपरशी टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की ट्रकचा पुढचा भाग पूर्णपणे चुराडा झाला. या घटनेत क्लिनर आत अडकून जागीच मरण पावला, तर चालक गंभीर जखमी झाला.
दरम्यान, अपघातानंतर ट्रकमध्ये भरलेले 22 टन मोहरीच्या तेलाचे बॅरल विखुरले गेले. अपघातानंतर लगेचच घटनास्थळी हे तेल लुटण्यासाठी स्थानिकांची झुंबड उडाली. लोकांनी ड्रायव्हर-क्लिनरला मदत करण्याऐवजी तेलाचे बॅरल लुटायला सुरुवात केली. ट्रकमध्ये अडकलेल्या जखमींना कोणीही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.
काही वेळाने या अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने ट्रक बाहेर काढला. या घटनेत क्लिनरचा जागीच मृत्यू झाला, तर चालकाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे.