कर्नाटककाँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. एका काँग्रेस आमदाराने केलेल्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते रणदीप सिंह सुरजेवाला बंगळुरु दौऱ्यावर येणार आहेत. याआधीच या आमदाराने विधान केले. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या जवळच्या आमदाराने मोठा दावा केला आहे.
"१०० आमदारांना आता मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बदल हवा आहे", असं मोठं विधान या आमदाराने केले आहे. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना हटवून डीके शिवकुमार यांच्याकडे कमान सोपवावी, अशी काही आमदारांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे.
'जर आता बदल झाला नाही तर २०२८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता धोक्यात येऊ शकते, असं सांगत काँग्रेसचे आमदार इक्बाल हुसेन यांनी उघडपणे डीके शिवकुमार यांना पाठिंबा दिला.
आमदार इक्बाल हुसेन म्हणाले, "हे फक्त माझे मत नाही, १०० हून अधिक आमदारांना बदल हवा आहे. अनेक आमदार या क्षणाची वाट पाहत आहेत. त्यांना सुशासनाची आशा आहे आणि डीके शिवकुमार यांना संधी मिळायला हवी असा त्यांचा विश्वास आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी पक्षासाठी दिवसरात्र काम केले आहे आणि पक्षाची ताकद वाढवली आहे.
यापूर्वीही अशा चर्चा झाल्या आहेत. मागच्यावेळी झालेल्या चर्चेवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले होते की, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय फक्त हायकमांडच घेऊ शकते. यावर इक्बाल हुसेन म्हणाले, "काँग्रेसमध्ये शिस्त आहे, आम्ही हायकमांडचा आदर करतो, पण आपण सत्य बोलले पाहिजे."
रणदीप सिंह सुरजेवाला कर्नाटकात पोहोचले
कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला कर्नाटकात पोहोचले आहेत. त्यांनी ही भेट संघटनात्मक असल्याचे म्हटले आहे. नेतृत्व बदलाच्या बातम्यांना त्यांनी केवळ काल्पनिक असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसोबत बैठक सुरू ठेवली आहे.
आमदारांसोबतच्या त्यांच्या तीन दिवसांच्या एक-एक बैठकीच्या पहिल्या टप्प्यात, सुरजेवाला आज बंगळुरू शहर, बंगळुरू ग्रामीण, बंगळुरू दक्षिण, चामराजनगर, म्हैसूर जिल्हे आणि दक्षिण कन्नड आणि कोलार येथील सुमारे २० आमदारांना भेटणार आहेत.