पाण्याच्या बादलीत बुडवून आईनेच केली नवजात अर्भकाची हत्या
By Admin | Updated: April 4, 2017 16:22 IST2017-04-04T15:54:52+5:302017-04-04T16:22:19+5:30
स्त्रीमध्ये मातृत्वाची, ममतेची भावना असते. त्यामुळे मूल जन्मल्यानंतर त्याला आईबद्दल सर्वाधिक ओढ वाटते. पण तेलंगणमध्ये या समजाला छेद देणारी एक घटना समोर आली आहे.

पाण्याच्या बादलीत बुडवून आईनेच केली नवजात अर्भकाची हत्या
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 4 - स्त्रीमध्ये मातृत्वाची, ममतेची भावना असते. त्यामुळे मूल जन्मल्यानंतर त्याला आईबद्दल सर्वाधिक ओढ वाटते. पण तेलंगणमध्ये या समजाला छेद देणारी एक घटना समोर आली आहे. एका 22 वर्षीय महिलेने प्रसूती झाल्यानंतर लगेचच आपल्या नवजात अर्भकाला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारले. हैदराबादच्या खासगी रुग्णालयात सोमवारी मध्यरात्री ही मनाला सून्न करून सोडणारी घटना घडली.
आरोपी महिला तेलंगणच्या खम्माम जिल्ह्यातील असून ती अविवाहीत आहे. मागच्या आठवडयात आरोपी महिला लॅब टेक्निशियन म्हणून रुग्णालयात रुजू झाली. त्यावेळी ती सात महिन्यांची गर्भवती होती. रुग्णालयाला ती गर्भवती असल्याचे माहित नव्हते असे पोलिसांनी सांगितले. सोमवारी आरोपी महिला रात्रपाळीला होती. रात्री 1.30च्या सुमारास रुग्णालय कर्मचा-यांना वॉशरुममधून मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला.
लगेचच रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आणि दोन नर्सेस वॉशरुमच्या दिशेने धावल्या. दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजाला ठोठावला. पण दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी दरवाजाच्या फटीतून आत पाहिले त्यावेळी महिला आपल्या नवजात अर्भकाला पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवत होती. त्यांनी तात्काळ दरवाजा तोडून आत प्रवेश केला तो पर्यंत अर्भकाचा मृत्यू झालेला होता.
आरोपी महिला खाली पडलेली होती. अशा प्रकारे झालेल्या प्रसूतीमुळे मोठया प्रमाणावर तिचा रक्तस्त्राव झाला होता. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिची चौकशी होणार आहे. अविवाहीत असल्याने आरोपी महिलेला मूल नको होते म्हणून तिने हे कृत्य केले असावे असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.