राजधानी दिल्लीत बलात्कारातील आरोपींची सुटका होण्याची सर्वाधिक शक्यता
By Admin | Updated: April 27, 2016 10:59 IST2016-04-27T08:44:21+5:302016-04-27T10:59:18+5:30
देशाची राजधानी दिल्लीमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपींची ८३ टक्के सुटका होण्याची शक्यता असते.देशात बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण सरासरी २८ टक्के आहे.

राजधानी दिल्लीत बलात्कारातील आरोपींची सुटका होण्याची सर्वाधिक शक्यता
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - देशाची राजधानी दिल्लीमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपींची ८३ टक्के सुटका होण्याची शक्यता असते. गलथान तपास, न्यायवैद्यक पुरावे नीट न हाताळणे आणि साक्षीदार सुरक्षा कार्यक्रमाचा अभाव यामुळे दिल्लीमध्ये बलात्कार प्रकरणात फार कमी आरोपींना शिक्षा होते.
देशात बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण सरासरी २८ टक्के आहे. दिल्लीमध्ये बलात्काराच्या इतक्या भयंकर घटना घडूनही शिक्षेचे प्रमाण फक्त १७ टक्के आहे. हिंदुस्थान टाईम्स या दैनिकाने दिल्लीतील बलात्कारांच्या खटल्यांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढला आहे. जानेवारी २०१४ ते मार्च २०१५ दरम्यान दिल्लीतील विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दिलेल्या ६६३ निकालांचे हिंदुस्थान टाईम्सने विश्लेषण केले.
६६५ आरोपींपैकी फक्त ११४ आरोपी दोषी ठरले. या प्रकरणांमध्ये तक्रारदारानेच सोबत पळून गेल्याची साक्ष दिल्याने ८७ आरोपींची सुटका झाली. संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर बलात्कार विरोधातील कायदा अधिक कठोर झाला. तरीही, व्यवस्थेतील दोषांमुळे आजही दिल्लीत बलात्काराच्या आरोपीची सहज सुटका होण्याचे प्रमाण जास्त आहे.
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर दिल्ली पोलिस न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी कमी वेळ घेतात. सरासरी ७१ दिवसांमध्ये बलात्काराचा खटला न्यायालयात दाखल होतो. २०१२ मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणापूर्वी खटला न्यायालयात दाखल व्हायला १०० पेक्षा जास्त दिवसांचा वेळ लागत होता. तरीही खराब तपासामुळे दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे.