चिनी हवाई दलात माकडांची फलटण

By Admin | Updated: May 8, 2014 23:20 IST2014-05-08T23:20:21+5:302014-05-08T23:20:21+5:30

चीनच्या हवाई दलाने चक्क माकडांची एक फलटणच तयार केली असून पक्ष्यांपासून आपल्या हवाई तळाचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. या फलटणीमध्ये मकॅक प्रजातीची माकडे आहेत.

Monkey Falaton in the Chinese Air Force | चिनी हवाई दलात माकडांची फलटण

चिनी हवाई दलात माकडांची फलटण

बीजिंग : चीनच्या हवाई दलाने चक्क माकडांची एक फलटणच तयार केली असून पक्ष्यांपासून आपल्या हवाई तळाचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. या फलटणीमध्ये मकॅक प्रजातीची माकडे आहेत. लढाऊ विमानांच्या आवागमनात पक्ष्यांच्या उपद्रवामुळे अडथळे येत होते. हा उपद्रव थांबावा म्हणून प्रशासनाने अगदी फटाके फोडण्यापासून शस्त्रांचाही वापर करून पाहिला; मात्र पक्ष्यांनी कशाला म्हणून कशालाच दाद दिली नाही. अखेर माकडे तैनातीचा निर्णय घेण्यात आला. ही मात्रा चांगलीच लागू पडली व पक्ष्यांचा उपद्रव कमी झाला. या माकडांना चिनी लष्करी वर्तुळात विनोदाने चिनी लष्कराचे नवे गोपनीय शस्त्र असे संबोधले जाते. या माकडांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. यात आसपासच्या झाडांवरील पक्ष्यांची घरटी नष्ट करणे आणि पाठलाग करून त्यांना हुसकावून लावणे याचा समावेश आहे. ही माकडे लष्करी कर्मचार्‍यांची आज्ञा पाळतात. प्रति माकड सहा याप्रमाणे ते हवाई तळाजवळील १८० घरटी नष्ट करण्यास सक्षम आहेत, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. चिनी लष्कराने माकडांचा वापर करून पक्ष्यांची डोकेदुखी दूर केली असली तरी एखाद्या लष्कराकडून प्राण्यांचा वापर केला जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. अमेरिकी लष्कराने पाणसुरुंग हुडकून त्यावर खुणा करण्यासाठी डॉल्फिनचा वापर केला होता. विविध लष्करांनी माकड आणि डॉल्फिन यांचा वापर केलेला असला तरी श्वान हा संपूर्ण जगातील लष्करांत सर्वाधिक वापर होणारा प्राणी आहे. ओसामा बिन लादेन याला ठार मारण्यासाठी करण्यात आलेल्या इतिहासातील सर्वात गुंतागुंतीच्या मोहिमेतही श्वानाचा वापर करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Monkey Falaton in the Chinese Air Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.