लसीकरणाला मुहूर्त! पुढील आठवड्यापासून सर्वांत माेठी माेहीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 07:26 IST2021-01-06T02:15:12+5:302021-01-06T07:26:32+5:30
Corona vaccination केंद्र सरकारतर्फे कोणत्याही लसीच्या निर्यातीवर बंदी घातलेली नाही, असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिले. आपत्कालीन वापरास मंजुरी मिळालेल्या लसींच्या निर्यातीवर बंदी घातल्याचे वृत्त पसरल्याने हा खुलासा करण्यात आला.

लसीकरणाला मुहूर्त! पुढील आठवड्यापासून सर्वांत माेठी माेहीम
- एस. के. गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशाच्या औषध नियंत्रकांनी ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर कोरोनामुळे चिंतेत पडलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. देशातील नागरिकांना ही लस नेमकी कधी दिली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पुढच्या आठवड्यात ही लसीकरणाची मोहीम देशात सुरू होऊ शकते, असे संकेत आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले आहेत.
लसीकरण नेमके कधी सुरू होणार याबाबत ‘लोकमत’ने विचारलेल्या प्रश्नावर राजेश भूषण म्हणाले, औषध नियंत्रकांनी ३ जानेवारीला या दोन्ही लसींना मंजुरी दिली. पुढच्या १० दिवसांत देशात लसीकरण सुरू करण्याचे नियोजन होते. त्यानुसार पुढील आठवड्याच्या पहिल्या एक-दोन दिवसांत देशात लसीकरण सुरू केले जाईल, अशी आशा आहे.
निर्यातीवर बंदी नाहीच
केंद्र सरकारतर्फे कोणत्याही लसीच्या निर्यातीवर बंदी घातलेली नाही, असे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी दिले. आपत्कालीन वापरास मंजुरी मिळालेल्या लसींच्या निर्यातीवर बंदी घातल्याचे वृत्त पसरल्याने हा खुलासा करण्यात आला.
मोहिमेसाठी ‘को-विन’ या ॲपच्या साहाय्याने लसीसाठी नोंदणी केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात ही लस तीन कोटी आरोग्य सेवक आणि कोविड योद्ध्यांना दिली जाणार आहे. त्यांची नोंदणी करावी लागणार नाही. इतरांना लसीसाठी नोंदणी करावी लागेल.
या ॲपमधून युनिक हेल्थ आयडी तयार केला जाईल. लस घेणाऱ्यांना क्यूआर कोड प्रमाणपत्र दिले जाईल.