'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:30 IST2025-12-21T18:28:49+5:302025-12-21T18:30:04+5:30
Mohan Bhagwat on Bangladesh: ' हिंदूंकरिता भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे भारत सरकारने या विषयाची दखल घेणे गरजेचे आहे.'

'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
Mohan Bhagwat on Bangladesh: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी बांगलादेशातीलहिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले की, बांगलादेशातहिंदू अल्पसंख्याक आहेत आणि तेथील परिस्थिती अत्यंत कठीण आहे. अशा परिस्थितीत हिंदूंनी आपल्या सुरक्षेसाठी एकजुटीने उभे राहणे अत्यावश्यक आहे.
VIDEO | At an event in Kolkata, RSS Sarsanghchalak Mohan Bhagwat says, “There are people who spread false narratives and outright lies about the Sangh. As the Sangh grows, some fear their vested interests will be threatened. Many know the name of the Sangh, but not its work,… pic.twitter.com/9Su5cm13hi
— Press Trust of India (@PTI_News) December 21, 2025
हिंदूंकरिता भारत एकमेव देश
भागवत पुढे म्हणतात, बांगलादेशातील हिंदूंना मदतीची गरज आहे. जगभरातील हिंदूंनी आपल्या परीने त्यांना मदत केली पाहिजे. आम्ही भारताच्या सीमांच्या आत राहून जेवढी मदत शक्य आहे, तेवढी करण्याचा प्रयत्न करत आहोत. अलीकडेच एका हिंदू युवकाला भररस्त्यात जिवंत जाळल्याची घटना घडल्याचे उदाहरण देत, परिस्थिती किती गंभीर आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, हिंदूंकरिता भारत हा एकमेव देश आहे. त्यामुळे भारत सरकारने या विषयाची दखल घेणे गरजेचे आहे. सरकार काही करत असेलही, पण काही गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. कधी प्रयत्नांना यश येते, कधी येत नाही, पण काही ना काही करणे आवश्यक आहे.
भारत हिंदूराष्ट्रच आहे...
जर हिंदू समाज एकजुटीने उभा राहिला, तर बंगालमधील परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही. मात्र, राजकीय बदलांबाबत विचार करणे हे आपले काम नसून, संघ सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर बोलताना भागवत म्हणाले, सूर्य पूर्वेला उगवतो, त्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसते. त्याचप्रमाणे हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे. जो भारताला आपली मातृभूमी मानतो आणि भारतीय संस्कृतीचा सन्मान करतो, तो या राष्ट्राचा भाग आहे. संविधानात ‘हिंदू राष्ट्र’ हा शब्द असो वा नसो, आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्ही हिंदू आहोत आणि आमचे राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे, हेच सत्य आहे. जन्मावर आधारित जातिव्यवस्था ही हिंदुत्वाची ओळख नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
#WATCH | Kolkata, West Bengal: On the foundation stone of Babri Masjid laid by suspended TMC MLA Humayun Kabir in Beldanga, RSS Chief Mohan Bhagwat says, "...Now, this is a political conspiracy to restart the dispute by rebuilding the Babri Masjid. This is being done for votes;… pic.twitter.com/V9j4707OSo
— ANI (@ANI) December 21, 2025
RSS मुस्लिमविरोधी नाही
राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, एक वाद होता, तो न्यायालयात गेला. न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधले गेले आणि वाद संपला. मात्र, पुन्हा बाबरी मशीद उभारून तो वाद जाणीवपूर्वक पुन्हा उकरून काढण्याचा प्रयत्न हा राजकीय कट आहे आणि तो केवळ मतांसाठी केला जात आहे. अशा प्रयत्नांचा ना हिंदूंना फायदा होणार आहे, ना मुसलमानांना. संघावर मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप फेटाळून लावताना भागवत म्हणाले, RSS चे काम पूर्णपणे पारदर्शक आहे. कोणीही येऊन प्रत्यक्ष पाहू शकतो. आम्ही हिंदूंना संघटित करतो, हिंदू समाजाच्या संरक्षणाची भाषा करतो, पण आम्ही मुस्लिमविरोधी नाही.