पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पतीच्या हत्येसाठी पत्नीने कट रचल्याचा आरोप; द्वेषपूर्ण कमेंट करणारा गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 19:29 IST2025-04-26T19:20:04+5:302025-04-26T19:29:27+5:30
पहलगाम हल्ल्याबद्दल द्वेषपूर्ण कमेंट केल्याबद्दल जबलपूरमध्ये मोहम्मद ओसाफ खानला अटक

पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पतीच्या हत्येसाठी पत्नीने कट रचल्याचा आरोप; द्वेषपूर्ण कमेंट करणारा गजाआड
Pahalgam Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियावर द्वेषपूर्ण टिप्पण्या दिल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पहलगाम हल्ल्याबाबत सोशल मीडियावर द्वेषपूर्ण पोस्ट केल्याबद्दल मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एका ३७ वर्षीय आरोपी मोहम्मद ओसाफ खानला अटक करण्यात आली आहे. पर्यटकांच्या क्रूर हत्येबद्दल भडकाऊ आणि द्वेषपूर्ण टीका केल्याबद्दल ओसाफ खानला अटक करण्यात आल्याची माहिती जबलपूर पोलिसांनी दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीने त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ओसाफ खान केला होता.
ओसाफ खान वैद्यकीय व्यवसायात असल्याचे समोर आले आहे. त्याने एका पोस्टच्या कमेंटमध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीने त्याच्या हत्येसाठी हा सगळा कट रचला होता असं म्हटलं होतं. पहलगाम हल्ल्याची ही पोस्ट होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या हत्याकांडात पती गमावलेल्या महिलेने त्याला मारण्यासाठी एका शूटरला कामावर ठेवले होते, अशी कमेंट ओसाफने केली. लग्नाच्या लाल बांगड्या घालून आणि तिच्या पतीच्या निर्जीव शरीराजवळ बसलेल्या महिलेचा हृदयद्रावक फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेचच त्याने पोस्टवर कमेंट केली होती.
"या महिलेची चौकशी झाली पाहिजे. कदाचित तिने एका गोळीबार करणाऱ्याला कामावर ठेवले असेल आणि संधी मिळताच त्याने तिच्या पतीला मारले असेल," असे ओसाफ खानने म्हटलं.
हल्ल्याच्या फक्त एक आठवडा आधी त्या महिलेचे लग्न झाले होते. पहलगाम हल्ल्यानंतर या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती, "आम्ही फक्त भेळपुरी खात होतो, बंदुक घेतलेली व्यक्ती तिथे आली आणि त्याने पतीला मुस्लिम आहे का विचारलं आणि गोळी मारली," असं रडत सांगत होती.
ओसाफ खानच्या कमेंटमुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवासी अभय श्रीवास्तव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर खानला अटक करण्यात आली. मोहम्मद ओसाफ खान यांच्या वक्तव्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी ओसाफ खानला भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १७० अंतर्गत अटक केली आहे. आता त्याला न्यायालयात हजर केले जाईल.