युती अभंग राहण्यासाठी मोदींची मध्यस्थी
By Admin | Updated: September 19, 2014 14:53 IST2014-09-19T12:06:48+5:302014-09-19T14:53:46+5:30
जागावाटपावरुन शिवसेना - भाजपमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच हा तणाव कमी करुन युती अभेद्य राहावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न सुरु केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

युती अभंग राहण्यासाठी मोदींची मध्यस्थी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - जागावाटपावरुन शिवसेना - भाजपमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच हा तणाव कमी करुन युती अभेद्य राहावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न सुरु केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. युतीविषयी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून या भेटीत मोदींनी युती कायम ठेवण्याची सूचना गडकरी यांना केली आहे.
लोकसभेत मिळालेल्या भरघोस यशानंतर भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मागितल्या आहेत. तर शिवसेनेने भाजपच्या मागणीला प्रतिसाद दिलेला नाही. यावरुन दोन्ही पक्षांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. यात भर म्हणजे गुरुवारी भाजपने शिवसेनेला जागा वाटपासंदर्भात तोडगा काढण्यासाठी १२ तासांचा अल्टिमेटम दिला होता. तर शिवसेनेने हा अल्टिमेटम धुडकावून लावले होते. यामुळे २५ वर्षांनंतर शिवसेना - भाजप युती तुटणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शिवसेना - भाजपच्या फलकांवरही एकमेकांचा उल्लेख टाळण्यात आल्याने हा तणाव आणखी वाढला होता.
यापार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत नरेंद्र मोदींनी युती कायम ठेवावी अशी स्पष्ट सूचना गडकरी यांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीनंतर गडकरी मुंबईत येणार असून यानंतरच युतीविषयी पुढील भूमिका मांडली जाईल असेही सूत्रांनी सांगितले.