मोदींचे सरकार बिल्डर समर्थक
By Admin | Updated: May 2, 2015 23:14 IST2015-05-02T23:14:18+5:302015-05-02T23:14:18+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरील हल्ला अधिक तीव्र करीत सरकारने खरेदीदारांऐवजी बिल्डर्सना लाभ मिळवून
मोदींचे सरकार बिल्डर समर्थक
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरील हल्ला अधिक तीव्र करीत सरकारने खरेदीदारांऐवजी बिल्डर्सना लाभ मिळवून देण्याकरिता स्थावर मालमत्ता नियमन प्राधिकरण विधेयकातील तरतुदी शिथिल केल्याचा आरोप शनिवारी केला.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फ्लॅट खरेदी करणाऱ्या अनेक लोकांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्यासमक्ष आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, केवळ शेतकरी आणि आदिवासीच नाही तर मध्यमवर्गीयांचीसुद्धा जमिनीच्या मुद्यावरून पिळवणूक होत आहे. सुट्यांवरून परतल्यापासून काँग्रेस उपाध्यक्षांनी भूसंपादन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. आता फ्लॅट खरेदी करणाऱ्यांच्याही पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
लोकांना एका ठराविक तारखेला फ्लॅटचा ताबा दिला जाईल, असे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात वर्षानुवर्षे फ्लॅट मिळत नाही. बऱ्याचदा फ्लॅटचा सुपरडुपर एरिया फार जास्त दाखविला जातो; पण बांधकाम झाल्यानंतर वेगळेच चित्र असते. अशा अनेक समस्या समोर आल्या आहेत.
माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अजय माकन यांनीही रालोआ सरकारवर टीकास्त्र सोडताना संपुआ सरकारने आणलेल्या स्थावर मालमत्ता नियमन प्राधिकरण विधेयकात ११८ दुरुस्त्या करण्यात आल्या असून, त्यापैकी बहुतांश बिल्डरांना लाभ मिळवून देणाऱ्या असल्याचा दावा केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)