जाहिरातींमधील स्वतःच्या छायाचित्रांवरही मोदींची नजर
By Admin | Updated: August 25, 2014 12:16 IST2014-08-25T12:15:04+5:302014-08-25T12:16:15+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून जाहिरातींमध्ये मोदींचे छायाचित्र वापरण्यावरही निर्बंध टाकले आहेत.

जाहिरातींमधील स्वतःच्या छायाचित्रांवरही मोदींची नजर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून जाहिरातींमध्ये मोदींचे छायाचित्र वापरण्यावरही निर्बंध टाकले आहेत. पंतप्रधानांचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्र यांनी सर्व मंत्रालयांना मोदींचे छायाचित्र वापरण्यासंदर्भात एक नियमावलीच पाठवेली आहे.
पंतप्रधानांचे छायाचित्र असलेल्या जाहिरातींची फायनल कॉपी पंतप्रधान कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठवली जात होती. जाहिरातीला परवानगी मिळाल्यावर पंतप्रधान कार्यालय जाहिरात आणि प्रसारमाध्यम संचालनालयाला संबंधीत जाहिरात पाठवली जात होती आणि या विभागाकडून सर्व वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांपर्यंत ही जाहिरात पोहोचवली जात होती. मात्र ही केवळ औपचारिक प्रक्रिया होती व यात पंतप्रधान कार्यालयाची छायाचित्रांची निवड करण्यात कोणतीही भूमिका नसायची.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही पद्धतही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाचे मुख्य सचिव नृपेंद्र मिश्र यांनी सर्व मंत्रालयाच्या मुख्य सचिवांना एक परिपत्रक पाठवले आहे. यात पंतप्रधानांचे छायाचित्र वापरण्यासंदर्भात नियमावलीच देण्यात आली आहे. यापुढे प्रत्येक मंत्रालयाने मोदींचे छायाचित्र असलेले जाहिरात देताना मोदींचे तीन छायाचित्र पाठवावे लागतील. यातील एका छायाचित्राची पंतप्रधान कार्यालय निवड करेल. जाहिरात प्रकाशित करण्याच्या पाच दिवसांपूर्वी फायनल कॉपी पंतप्रधान कार्यालयात पोहोचली पाहिजे असे या पत्रकात म्हटले आहे.
टार्गेट ऑडियन्स लक्षात ठेऊनच जाहिरात तयार करावी असे स्पष्ट निर्देश या पत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. प्रत्येक जाहिरातीखाली संबंधीत विभागाचे अधिकृत संकेतस्थळाची लिंकही देण्यात यावी तसेच सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर करावा अशी सूचनाही सर्व खात्यांच्या सचिवांना देण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांच्या मर्जीतील वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांना जाहिरात देण्यावरही निर्बँध घालण्यात आले आहे. यापुढे जाहिरात देताना संबंधीत वृत्तपत्राचा खप आणि प्रेक्षकवर्ग लक्षात घेऊनच जाहिराती दिल्या जाव्यात असेही कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.