मोदींचे डिग्री प्रकरण - केजरीवालांविरोधात अटक वारंट
By Admin | Updated: April 11, 2017 13:01 IST2017-04-11T13:01:21+5:302017-04-11T13:01:21+5:30
केजरीवाल यांनी मोदींच्या पदवीसंदर्भात उपस्थित केलेल्या आरोपावरुन ते अडचणीत सापडले आहेत.

मोदींचे डिग्री प्रकरण - केजरीवालांविरोधात अटक वारंट
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - केजरीवाल यांनी मोदींच्या पदवीसंदर्भात उपस्थित केलेल्या आरोपावरुन ते अडचणीत सापडले आहेत. केजरीवाल यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान मोदींच्या पदवीवर शंका उपस्थित करत ते फक्त बारावी पास असल्याचे म्हटले होते. याबाबत 15 डिसेंबवर 2016 रोजी त्यांनी ट्विटही केले होते. याप्रकरणी आसामच्या एका न्यायालयाने केजरीवाल यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरोधात भाजपचे नेते सुर्य रॉन्घर यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. या आधारे पोलिसांनी केजरीवाल यांच्याविरोधात कलम 499, 500 आणि 501 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 8 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. गेल्या दोन सुनावणीच्यावेळी केजरीवाल गैरहजर राहिल्यामुळे न्यालयाने त्यांच्याविरोधात अटक वारंट जारी केले आहे. यापुर्वी 10 एप्रिल आणि 30 मार्च रोजी त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते त्यावेळी केजरीवाल गैरहजर राहिले होते.
माध्यामांच्या वृत्तानुसार, केजरीवाल यांच्याविरोधात मानहानीची सुनावणी करताना 10 हजार रूपयांच्या जामिनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे. मागील दोन सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याबद्दल हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर लोकांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यावरून केजरीवाल यांनी मोदींच्या शैक्षणिक योग्यतेवर प्रश्न उपस्थित केले होते. केजरीवाल यांच्यावर दाखल केलेल्या कलमानुसार केजरीवाल यांना 2 वर्षांपर्यंत तुरूंगवास होऊ शकतो. किंवा दंड आणि तुरूंगवास दोन्हीही होऊ शकतो.
काय आहे प्रकरण -
मोदींची डिग्री जाहीर करा - केजरीवाल यांचे दिल्ली विद्यापीठाला पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींची बीए ची डिग्री जनतेला दाखवा अशी मागणी करणारे पत्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विद्यापीठाला लिहिले आहे. दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केजरीवाल यांनी म्हटले आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भातली माहिती विद्यापीठाने वेबसाईटवर जाहीर करावी.
निवडणूक लढवताना दिलेल्या माहितीमध्ये नरेंद्र मोदींनी दिल्ली विद्यापीठातून बीए केल्याचा दाखला दिल्याचा संदर्भ केजरीवाल यांनी दिला आहे.
पंतप्रधान मोदी राज्यशास्त्रात एम.ए. - गुजरात विद्यापीठ
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक अर्हतेवरून शंकाकुशंकांना पेव फुटले असतानाच मोदी यांनी सुमारे ३३ वर्षांपूर्वी राज्यशास्त्रात एम.ए. ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत मिळविली असल्याचा खुलासा गुजरात विद्यापीठाने रविवारी केला. बाह्य विद्यार्थी म्हणून ही परीक्षा दिलेल्या मोदींना ६२.३ टक्के गुण मिळाले होते. गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू एम.एन. पटेल यांनी ही माहिती देताना सांगितले की, नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी १९८३ साली राज्यशास्त्र या विषयात एम.ए. केले होते. त्या परीक्षेत मोदींनी ८०० पैकी ४९९ गुण मिळविले होते.
चार दशकांपूर्वीचं रेकॉर्ड नाही - दिल्ली विद्यापीठ
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिल्ली विद्यापीठाने याच संदर्भात वेगळे उत्तर दिल्याचे समोर आले आहे. गलगली यांनी सप्टेंबर 2015मध्ये नरेंद्र मोदींच्या डिग्रीसंदर्भात विचारणा केली होती. त्यावेळी विद्यापीठाने चार दशकांपूर्वीचा रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे गलगली यांना कळवले होते. गलगली यांनी यासंदर्भातली कागदपत्रे ट्विटरवर अपलोड केली आहेत.
तसेच, चार दशकापूर्वीचा रेकॉर्ड नसल्याचं उत्तर दिल्ली विद्यापीठाने आपल्याला दिलं होतं, मग आता डिग्री कुठून सापडली असा सवालही गलगली यांनी केला आहे.