मोदींचा गुन्हा; पण आता काही करू शकत नाही
By Admin | Updated: July 2, 2014 10:31 IST2014-07-02T03:15:55+5:302014-07-02T10:31:32+5:30
निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक माहिती दडवून ठेवणे अथवा चुकीची माहिती देणे हा लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२३(ए)(३) नुसार गुन्हा आहे.

मोदींचा गुन्हा; पण आता काही करू शकत नाही
अहमदाबाद : सन २०१२ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञापत्रात वैवाहिक स्थितीसंबंधीचा रकाना कोरा ठेवून त्यावेळचे मुख्यमंत्री व आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुन्हा केल्याचे दिसून येत असले तरी याविषयीची फिर्याद विलंबाने केलेली असल्याने त्यावर ‘एफआयआर’ नोंदविण्याचा आदेश आपण पोलिसांना देऊ शकत नाही, असा निकाल येथील दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे.
निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक माहिती दडवून ठेवणे अथवा चुकीची माहिती देणे हा लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२३(ए)(३) नुसार गुन्हा आहे. मोदी यांनी २०१२ मध्ये मणिनगर मतदारसंघातून गुजरात विधानसभेची निवडणूक लढविताना आपला जसोदाबेन यांच्याशी विवाह झाल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नव्हती. आता लोकसभेची निवडणूक लढविताना मोदी यांनी प्रथमच आपण विवाहित असल्याचा उल्लेख उमेदवारी अर्जात केला होता व त्यावरून मोठा वादही झाला होता.
मोदी यांनी असत्य प्रतिज्ञापत्र करून व ते प्रतिज्ञापत्र स्वीकारून मणिनगर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पी.के.जाडेजा यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गुन्हा केलेला असल्याने त्यांच्याविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदवावा, अशी फिर्याद आम आदमी पार्टीचे स्थानिक नेते निशांत वर्मा यांनी पोलिसांकडे केली होती. परंतु त्यावर पोलिसांनी काहीच केले नाही म्हणून त्यांनी दंडाधिकारी न्यायालयात खासगी फौजदारी फिर्याद दाखल केली होती.
मात्र, वर्मा यांची ही फिर्याद फेटाळताना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एम. एम. शेख यांनी नमूद केले,‘प्रतिज्ञापत्रातील संबंधित रकाना कोरा सोडून (मोदी यांनी) लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम १२३(ए)(३) अन्वये गुन्हा केल्याचे दिसून येते. पण यासंबंधीची तक्रार एक वर्ष चार महिन्यांनी केली गेली असल्याने दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४६८ नुसार या गुन्ह्याची दखल घेण्यास हे न्यायालय असमर्थ आहे.’ म्हणजेच या गुन्ह्याच्या संदर्भात आता ‘एफआयआर’ नोंदविण्याचा आदेश आपण देऊ शकत नाही, असे दंडाधिकाऱ्यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)