डीडीच्या विकासासाठी मोदींचा 'बीबीसी पॅटर्न'
By Admin | Updated: March 6, 2015 17:02 IST2015-03-06T17:02:37+5:302015-03-06T17:02:37+5:30
निर्भयावरील डॉक्यूमेंटरी दाखवल्याने बीबीसी विरोधात भारतात नाराजीचे वातावरण असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बीबीसीचा व्यावसायिक दृष्टीकोन चांगलाच भावला आहे.

डीडीच्या विकासासाठी मोदींचा 'बीबीसी पॅटर्न'
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8000001907349px;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ - निर्भयावरील डॉक्यूमेंटरी दाखवल्याने बीबीसी विरोधात भारतात नाराजीचे वातावरण असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बीबीसीचा व्यावसायिक दृष्टीकोन चांगलाच भावला आहे. बीबीसीच्या धर्तीवर प्रसारभारतीच्या डीडीचाही विकास करण्याचे प्रयत्न मोदींनी सुरु केले आहे.
दुरदर्शनच्या मेकओव्हरसाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून प्रसारभारतीला सरकारने गेल्या वर्षी ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यातील २६ कोटींचा निधी प्रसारभारतीच्या तिजोरीत जमा झाला आहे. प्रसारभारतीच्या अंतर्गत येणा-या दुरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ या दोन्ही माध्यमांच्या आधुनिकीकरणासाठी हा निधी देण्यात आला आहे. दुरदर्शन देश का अपना चॅनल या नव्या घोषवाक्यासह मैदानात उतरला आहे. तर डीडी न्यूजने 'सिर्फ खबर, पूरी खबर' चा नारा देत अन्य वृत्तवाहिन्यांसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने त्यांच्या मंत्र्यांना सर्वप्रथम डीडीला मुलाखत द्यायला सांगण्यात आले आहे. यामुळे अन्य वाहिन्यांपूर्वी डीडी न्यूजकडे मंत्र्यांची विशेष मुलाखत उपलब्ध असेल. अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री अरुण जेटली व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी डीडीला विशेष मुलाखती दिल्या होत्या.
याशिवाय या वाहिन्यांवर केंद्र सरकारच्या नवनवीन योजनांची माहितीही दिली जाणार आहे. भारतातील अन्य वृत्तवाहिन्यांच्या तुलनेत डीडी न्यूजने स्वतःचा दर्जा सांभाळला आहे. बीबीसी, अल जझीरा आणि अन्य आंतरराष्ट्रीय चॅनलप्रमाणेच आता डीडीचीही वाटचाल सुरु आहे असे डीडी न्यूजच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले. डीडी न्यूजला नवीन आणि अभ्यासू पत्रकारांची भरती केली जात असून आधुनिक तंत्रज्ञान हाताळण्याचा अनुभव असलेले तंत्रज्ञही नेमले जात आहे. विशेष म्हणजे या सर्वांच्या पगारातही वाढ केली जात आहे असेही सूत्रांनी सांगितले. तर विद्यमान कर्मचा-यांचे त्यांच्या कामानुसार ग्रेडींग केले जात आहे असेही अधिका-यांनी स्पष्ट केले. डीडीला बीबीसीसारख्या व्यावसायिकतेच्या वाटेवर नेण्याचे प्रयत्न सुरु असले तरी बातम्यांच्या बाबतीत बीबीसीसारखा दृष्टीकोन दाखवण्याची हिंमत मोदी सरकार करेल का हा मोठा प्रश्नच आहे.