केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर बोट ठेवत काँग्रेससह विरोधी पक्षांनी भाजपला घेरले. बुधवारी या विधानाचे पडसाद उमटले. काँग्रेसनेअमित शाहांच्या विधानावरून कोंडी करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार केला. मोदींनी केलेल्या ट्विटवरून आता माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टोला लगावला.
'पंतप्रधानजी, तुमचे स्पष्टीकरण वाचून मी स्तब्ध झालो आहे', असा उपरोधिक टोला सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी केलेल्या पोस्टवरून अरविंद केजरीवालांनी लगावला.
केजरीवालांचा मोदींना सवाल
केजरीवाल पुढे म्हणाले, "तुमचे म्हणणे आहे की, काँग्रेस बाबासाहेबांच्यासोबत चांगली वागली नाही. मग ही गोष्ट तुम्हाला, तुमच्या पक्षाला आणि तुमच्या गृहमंत्र्यांना बाबासाहेबांचा अपमान करण्याचा अधिकार कशी देते?", असा सवाल केजरीवालांनी मोदींना केला.
"काँग्रेस बाबासाहेबांसोबत चुकीचे वागत होती, तर मग तुम्ही पण वागणार का? देशाच्या पंतप्रधानांचे हे असे कसे स्पष्टीकरण आहे?", असा प्रश्न केजरीवालांनी केला.
"काल (१७ डिसेंबर) सभागृहात ज्या प्रकारे गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा अपमान केला, त्यामुळे सगळा देश संतप्त आहे. आणि आता तुमच्या विधानाने त्यावर मीठ लावण्याचे काम केले आहे", अशी टीका केजरीवालांनी केली.
पंतप्रधान मोदी काय म्हणालेले?
पंतप्रधानांनी मोदींचे ट्विट काय?
काँग्रेस आणि विरोधकांनी अमित शाहांच्या विधानावरून भाजपला घेरल्यानंतर पंतप्रधान मोदी ट्विट करत पलटवार केला.
"काँग्रेस आणि त्यांची सडलेली इकोसिस्टमला असा विचार करत असेल की, त्यांचे हे असत्य अनेक वर्षांचे वाईट कर्म लपवेल, विशेषतः डॉ. आंबेडकरांच्या केलेल्या अपमानाबद्दल, तर चुकीचा विचार करत आहेत. देशातील लोकांनी वारंवार हे बघितले आहे की, एक वंशाचे नेतृत्व असलेल्या पक्षाने डॉ. आंबेडकरांचा वारसा कसा मिटवण्याचा आणि एससी/एसटी समुदायांचा अपमान करण्यासाठी कशा हरतऱ्हेने वाईट गोष्टी केल्या आहेत", असे मोदी म्हणाले.
"त्यांचा (बाबासाहेब आंबेडकर) एकदा नव्हे दोन वेळा पराभव केला. पंडित नेहरूंनी त्यांच्याविरोधात प्रचार केला आणि त्यांचा पराभव प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला. त्यांना भारतरत्न देण्यास नकार दिला. त्यांचे तैलचित्र संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्यास नकार दिला", अशी टीका करत मोदींनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिले.