मोदी सरकारचे पुनरागमन अशक्य - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2019 05:30 IST2019-02-10T05:29:51+5:302019-02-10T05:30:22+5:30
लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांना नेमक्या किती जागा मिळतील, या आकड्यांच्या खेळात मी अजिबात पडणार नाही, मात्र नरेंद्र मोदी सरकारचे पुनरागमन शक्य नाही, हा आत्मविश्वास वृद्धिंगत होत चालला आहे.

मोदी सरकारचे पुनरागमन अशक्य - शरद पवार
- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांना नेमक्या किती जागा मिळतील, या आकड्यांच्या खेळात मी अजिबात पडणार नाही, मात्र नरेंद्र मोदी सरकारचे पुनरागमन शक्य नाही, हा आत्मविश्वास वृद्धिंगत होत चालला आहे. प्रत्येकाच्या बोलण्यातून मला त्याचा प्रत्यय येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांच्या एकजुटीचे जे चित्र उभे राहील ते अभूतपूर्व असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
देशपातळीवर विरोधी पक्षांच्या निवडणूकपूर्व महाआघाडीचा आमचा इरादा नाही. प्रत्येक राज्यात मजबूत असलेल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली अन्य विरोधकांनी एकत्र यावे आणि मोदी सरकारच्या पराभवाचे सूत्र केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढवावी. त्यादृष्टीने जागावाटप करावे, असे सूत्र आहे. निवडणुकीच्या निकालानंतर विजयी विरोधकांची महाआघाडी निश्चित लक्षवेधी असेल, असा मला विश्वास आहे, असे सांगताना आताच्या विरोधकांना भाजपापेक्षा अधिक जागा मिळतील, असे संकेत शरद पवार यांनी दिले.
कोलकात्यात अलीकडेच झालेल्या ममता बॅनर्जींच्या महारॅलीत २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. लवकरच अजमेर, चंदीगड, भोपाळ, लखनऊ, मेरठ, बंगळुरू, हैदराबाद, अमरावती (आंध्र प्रदेश) चेन्नई व कोची या १० मोठ्या शहरांमध्येही विरोधी पक्षांच्या संयुक्त महारॅलींचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहितीही पवार यांनी दिली.
विरोधकांच्या हक्काचे केंद्र
दिल्लीत शरद पवारांचे निवासस्थान, सध्या विरोधकांच्या महाआघाडीचे हक्काचे केंद्र बनले आहे. सर्वांना समजावून घेणारा नेता अशी पवारांची प्रतिमा असल्याने या बंगल्यावरची वर्दळ वाढली आहे. विविध राज्यांतील बहुतांश प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची अस्वस्थ पावले त्यांच्याकडे वळतात अन् पवारांशी सल्लामसलत केल्यानंतर काहीशा निर्धास्त मन:स्थितीत ही मंडळी परततात, असे दृश्य आहे.