"जनतेला मूर्ख बनवलं जातंय, सिंधूचे पाणी अडवायला २० वर्षे लागतील"; अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:19 IST2025-04-26T15:00:40+5:302025-04-26T15:19:26+5:30
मोदी सरकारकडे सिंधू नदीचे पाणी रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

"जनतेला मूर्ख बनवलं जातंय, सिंधूचे पाणी अडवायला २० वर्षे लागतील"; अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींचा दावा
Swami Avimukteshwaranand Saraswati on Indus Waters Treaty Suspend:जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारकडून सिंधू करारावर स्थगिती देण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या दोन तासांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सिंधू जल कारारासंदर्भात भारताने घेतलेल्या निर्णयावरुन पाकिस्तानाने टीका केलीय. दुसरीकडे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोदी सरकारकडे सिंधू नदीचे पाणी रोखण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याचे म्हटलं आहे. जनतेला मूर्ख बनवले जात आहे असेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, २३ एप्रिल रोजी केंद्र सरकारने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानसोबतचा 'सिंधू पाणी करार स्थगित करण्याबाबत शुक्रवारी जलशक्ती मंत्रालयाची बैठक झाली.बैठकीनंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही, असे म्हटलं. त्यानंतर आता शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मोठा दावा केला आहे. सिंधू नदीचे पाणी अडवण्यासाठी भारताला २० वर्षे लागतील असे त्यांनी म्हटलं.
"आम्ही माहिती काढली की सिंधू नदीचे पाणी थांबवण्याची कोणती व्यवस्था भारत सरकारकडे आहे. तेव्हा माहिती मिळाली की भारताकडे सिंधू नदीचे पाणी अडवण्यासाठी कोणतीच व्यवस्था भारताकडे नाही. जर भारताला सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानात जाण्यापासून थांबवण्यासाठी व्यवस्था करायला लागली तर कमीत कमी २० वर्षे लागतील. पैसे किती लागतील याचा विचारच करु नका. कमीत कमी २० वर्षांचा वेळ लागेत तेव्हा सिंधू नदीचे पाणी भारत आपल्याकडे अडवू शकेल. तुम्ही म्हणताय की आम्ही सिंधू नदीचे पाणी थांबवू. याचा अर्थ जनतेला मूर्ख बनवलं जातंय. ज्यांचे अपयश आहे त्यांना पकडलं पाहिजे," असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
"काश्मीरमध्ये हल्ला झाला, मी ऐकले आहे की सरकार चार धाम यात्रा (उत्तराखंडमध्ये) पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. पण मला वाटतं यात्रा पुन्हा सुरू झाली पाहिजे. आता खात्री झाली आहे की कोणीतरी हिंदूंना आव्हान देत आहे. जर असे आव्हान असेल तर सरकारने आव्हान स्वीकारले पाहिजे आणि उत्तर दिले पाहिजे. अतिरेकी सहजपणे घुसले, शस्त्रे घेऊन आले, लोकांना मारले आणि नंतर निघून गेले. या घटनेवरून असे दिसून येते की सर्व हिंदूंनी स्वतःला सुरक्षित करण्याचा विचार केला पाहिजे. जर गरज असेल तर हिंदूंनी स्वतःच्या शस्त्रांनी स्वतःचे रक्षण केले पाहिजे. ते म्हणतात की ते चौकीदार आहेत, पण तरी अतिरेक्यांना प्रतिकार करण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. जर ते पाकिस्तानातून आले असतील तर कारवाई झाली पाहिजे. या घटनेतून आपल्याला शिकण्याची गरज आहे. सगळ्यात आली आपल्याला अशा लोकांना जबाबदार धरण्याची, शिक्षा देण्याची गरज आहे ज्यांनी आपले रक्षण करण्यात चूक केली आहे. नंतर, जर बाहेरचा कोणाचा हात असेल तर आपण त्यांच्यावरही हल्ला केला पाहिजे," असेही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.