Modi: Bhumi Pujan day is not historic, neither ghost nor future! | मोदी : भूमिपूजनाचा दिवस ऐतिहासिकच नव्हेतर, न भूतो, न भविष्यति!

मोदी : भूमिपूजनाचा दिवस ऐतिहासिकच नव्हेतर, न भूतो, न भविष्यति!

अयोध्या : कैक वर्षांपासून रामभक्त ज्या क्षणाची प्रतीक्षा करीत होते, त्या राम मंदिराच्या बांधकामाला आता लगेचच सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचे बुधवारी शास्त्रोक्त पद्धतीने विधिपूर्वक भूमिपूजन झाले आणि देशातील सर्वच मंदिरांमध्ये ‘जय श्रीराम’ असा जयघोष झाला. हा दिवस रामभक्तांसाठी सुवर्णदिन ठरला.

भूमिपूजनासाठी सजलेल्या अयोध्येत दिवाळीच सुरू झाली. भूमिपूजन समारंभ मोजक्या १७५ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला; पण आता राम मंदिर उभे राहणार, याचा आनंद जगभरातील रामभक्तांना झाला. पंतप्रधान मोदी यांचे दुपारी ११ वाजता समारंभासाठी आगमन झाले. भूमिपूजनाआधी हनुमानगढीचे त्यांनी दर्शन घेतले, तिथे साष्टांग प्रणाम घातला. मंदिराजवळ पारिजातकाचे रोप लावले. विराजमान रामलल्लाचेही दर्शन घेतले. भूमिपूजन समारंभानंतर मान्यवर व साधू, संत व महंत यांच्याशी संवाद साधताना मोदी यांनीही ‘जय श्रीराम’चा नारा दिला. विशेष टपाल तिकिटाचे त्यांनी अनावरण केले. रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल व राम मंदिर न्यासाचे नृत्य गोपाल दास हेही मंचावर होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांनी उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळविले होते. विनय कटियार व उमा भारती या वेळी उपस्थित होते.

अयोध्या : रामजन्मभूमीच्या पवित्र स्थानावर भव्य राम मंदिर उभारणे हे राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले. हे मंदिर भावी पिढ्यांना आस्था, श्रद्धा व संकल्पाची प्रेरणा देत राहील, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
या मंदिराच्या कामाचे शास्त्रोक्त पद्धतीने विधिपूर्वक भूमिपूजन केल्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मोजक्या निमंत्रितांसमोर मोदी बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीला ‘जय सियाराम’चा त्रिवार उद्घोष करून मोदींनी जाहीर केले की, उद््ध्वस्त होणे व त्यातूनच पुन्हा उभे राहणे या चक्रातून प्रभू रामचंद्रांची ही जन्मभूमी आज कायमची मुक्त झाली आहे. आज सुरू होत असलेले मंदिराचे बांधकाम हे श्रीरामांच्या अद्भूत शक्तीनेच शक्य होत असल्याचे सांगून पं्रतप्रधान म्हणाले की, वास्तू नष्ट केल्या गेल्या. अस्तित्व कायमचे संपविण्याचेही भरपूर प्रयत्न झाले. पण भगवान राम आजही आपल्या मनात वसलेले आहेत. ते आपल्यामध्ये मिसळून गेले आहेत, आपल्या संस्कृतीचे प्रतिक बनले आहेत. श्रीराम ही भारताची मर्यादा आहे. म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत.

मोदी पुढे म्हणाले की, हे राममंदिर भारताच्या आधुनिक संस्कृतीचे प्रतिक बनेल, आपल्या शाश्वत आस्तेचे प्रतिक बनेल. आपल्या राष्ट्रीय भावनेचे प्रतिक बनेल आणि कोट्यवधी लोकांच्या सामूहिक संकल्पशक्तीचेही प्रतिक बनेल. आजचा हा दिवस केवळ एतिहासिकच नव्हे तर न भूतो, न भविष्यती असा असल्याचे सांगून मोदी पुढे म्हणाले की, येथे उभारले जाणारे मंदिर ही सत्य, अहिंसा, आस्था व बलिदानाला न्यायप्रिय भारताने दिलेली अनूपम भेट आहे. यामुळे भारताची किर्तीपताका युगान्युगे दिगंतात फडकत राहील.
राममंदिरासाठी झालेल्या आंदोलनाची तुलना स्वातंत्र्यलढ्याशी करून मोदी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच या राममंदिरासाठी कित्येक शतके, कित्येक पिढ्यांनी अविरत एकनिष्ठेने एकनिष्ठ प्रयत्न केले. मंदिराचे स्वप्न साकार होण्याचा आजचा हा दिवस त्याच तपाचे, त्यागाचे व संकल्पाचे फळ आहे. आज या निमित्ताने देशाच्या इतिहासात सुवर्ण अध्याय लिहिला जात आहे. कित्येक शतकांची प्रतीक्षा आज संपत आहे. त्यामुळेच आज संपूर्ण देश राममय झाला आहे, रोमांचित व भावुकही झाला आहे.

आजच्या या स्वप्नपूर्तीचा पाया ज्यांच्या तपश्चर्येने रचला गेला अशा सर्वांना शतश: नमन करून पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण सृष्टीतील शक्ती या कार्याला आशीर्वाद देत आहेत, रामजन्मभूमीच्या पवित्र आंदोलनाशी निगडित प्रत्येक व्यक्तीच्या भावना उचंबळून आल्या आहेत. खरे तर आजचा दिवस आयुष्यात पाहायला मिळतोय यावर कोट्यवधी लोकांचा विश्वासही बसत नाही आहे. पंतप्रधान म्हणाले की, या मंदिर उभारणीने केवळ इतिहास रचला जात नाही तर इतिहासाची पुनरावृत्तीही होत आहे. श्रीरामांच्या विजयात सहभागी होण्याचे सौभाग्य अगदी छोट्याशा खारीपासून वानरांपर्यंत आणि नावाड्यापासून वनवासी बांधवांपर्यंत सर्वांना मिळाले त्याचप्रमाणे देशभरातील लोकांच्या मदतीने हे पुण्यकर्म साकार होत आहे.

टाइम्स स्क्वेअरवर प्रभू श्रीरामांची प्रतिमा व राममंदिर झळकले
अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनानिमित्त भारतात जल्लोष होत असतानाच अमेरिकेतही भारतीयांनी उत्सव साजरा केला. त्यानिमित्त न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर प्रभू श्रीरामांची प्रतिमा व राममंदिर झळकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत अनेक ठिकाणी व्हर्च्युअल समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. वॉशिंग्टनमध्ये विश्व हिंदू परिषदेने भव्य देखाव्याची मिरवणूक काढली होती.


श्रीरामांनी आपल्याला कर्तव्यपालनेची शिकवण दिली आहे. त्यांनी विरोधातूनही बाहेर पडण्याचा शोध व बोधाचा मार्ग दाखविला आहे. आता आपल्याला परस्परांतील प्रेम व बंधुभावाने राममंदिराच्या विटा जोडायच्या आहेत. मानवतेने रामाचा स्वीकार केला तेव्हा विकास झाला व त्या मागार्पासून दुरावली तेव्हा विनाश झाला, हे आपण लक्षात ठेवायला हवे. सर्वांच्या भावनांची कदर करून सर्वांच्या साथीने, सर्वांच्या विश्वासाने सर्वांचा विकास करायचा आहे. परिश्रम व दृढसंकल्पाने आत्मविश्वासी आणि आत्मनिर्भर भारत घडवायचा आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मन मंदिरही हवे
आजचा क्षण हा भारताच्या पुनर्निर्माणाचा आहे. संघाने ज्यासाठी ३० वर्षे अथक परिश्रम केले ते आज सत्यात उतरत आहे. राम मंदिरासोबतच आपल्याला मन मंदिराचीही उभारणी करावी लागेल.
- मोहन भागवत, सरसंघचालक

जगासाठी आदर्श
पाच शतकांनंतर जन्मस्थानी रामलल्लांचे भव्य मंदिर उभे राहणे हा क्षण खरेच ऐतिहासिक आहे. पंतप्रधान मोदी यांची दूरदृष्टी व सुजाण नेतृत्वामुळेच हे शक्य होत आहे. - योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

पंतप्रधान मोदी : राम मंदिराच्या भूमिपूजनाने देशभर उत्साह, उत्सव

राम मंदिराची उभारणी हे राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Modi: Bhumi Pujan day is not historic, neither ghost nor future!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.