भाजपतील घराणेशाहीवर मोदींनी केला आघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 06:39 AM2019-04-10T06:39:24+5:302019-04-10T06:39:27+5:30

कुटुंबात दोन उमेदवाऱ्या नाहीत : बिरेंदर सिंग, जगदीश मुखी, सिन्हा नाराज

Modi attacks on BJP's dynasty | भाजपतील घराणेशाहीवर मोदींनी केला आघात

भाजपतील घराणेशाहीवर मोदींनी केला आघात

Next

- हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या भाजप नेत्यांना उमेदवारी न देण्याच्या नियमाबरोबरच एकाच कुटुंबात दोघांना उमेदवारी न देण्याचा नियमही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. भाजपतील घराणेशाहीला लगाम घालण्यासाठी केलेल्या या नियमाचा अनेक नेत्यांना फटका बसला आहे.
७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाचा फटका भाजपाच्या १६ ज्येष्ठ नेत्यांना बसला आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन आणि करिया मुंडा यांचा त्यात समावेश आहे.


मोदी यांनी मनेका गांधी आणि वरुण गांधी यांनाही हाच नियम लावण्यास सांगितले होते. तथापि, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मनेका-वरुण यांचा या नियमाला अपवाद करण्याची विनंती केली
होती.


लक्षणीय म्हणजे अनुराग ठाकूर आणि दुष्यंत सिंग यांनाही या नियमाला अपवाद करून उमेदवारी मिळाली आहे. हा नियम नव्या प्रकरणांत लावला जाणार आहे. ज्यांना उमेदवाऱ्या मिळाल्या त्यांना मिळाल्या, यापुढे मात्र राजकारणात सक्रिय असलेल्यांच्या मुलांना अथवा कुटुंबियांना उमेदवारी दिली जाणार नाही.

राज्यपाल पुत्राला उमेदवारी नाही
आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारी मागितली होती. ती नाकारण्यात आली आहे. पोलादमंत्री चौधरी बिरेंदर सिंग यांचे पुत्र बिर्जेंदर सिंग यांना रोहतक आणि हिसार येथून उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
आयएएस अधिकारी असलेले बिर्जेंदर सिंग राजकारणात येऊ इच्छित होते. राज्यसभा सदस्य आर. के. सिन्हा यांचे पुत्र ऋतुराज सिन्हा यांना पाटणा साहिब येथून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला रामराम ठोकल्यामुळे आर. के. सिन्हा यांनी आपल्या पुत्रासाठी ही जागा मागितली होती.

Web Title: Modi attacks on BJP's dynasty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.