अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाने सांधेरोपण यशस्वी
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:55+5:302015-02-14T23:51:55+5:30
- योगेश चौधरी

अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाने सांधेरोपण यशस्वी
- ोगेश चौधरी नाशिक : अलीकडे माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात वैद्यकीय तंत्रज्ञानदेखील झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सांधेरोपण शस्त्रक्रियादेखील यशस्वी होत आहेत. नागरिकांनी सांधेरोपण शस्त्रक्रियेकडे सकारात्मक दृष्टीने बघणे गरजेचे असल्याचे मत वोक्हार्ट रुग्णालयाचे अस्थिरोग व सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. योगेश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.४६ वर्षीय रोशन शेख या महिलेच्या गुडघ्याच्या सांधेरोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेविषयी माहिती देताना चौधरी बोलत होते. शेख यांच्या उजव्या पायाचा गुडघा क्षयरोगाच्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून निकामी झाला होता. त्यांना एका पायाला यामुळे अपंगत्व आल्याने ते परावलंबी झाल्या होत्या. महिनाभरापूर्वी त्यांच्या गुडघ्याचे सांधेरोपण करण्यात आले. विदेशी धातूपासून बनविलेला सांधा गुडघ्यात बसविण्याची अवघड अशी शस्त्रक्रिया वोक्हार्ट रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर वीस दिवसांतच ही महिला स्वत:च्या पायावर चालण्यास सक्षम झाल्याचे डॉ. चौधरी म्हणाले. त्याचप्रमाणे रोशन यांनीदेखील शस्त्रक्रियेपूर्वीची कैफियत सांगितली व सांधेरोपणाच्या शस्त्रक्रियेमुळे मी आज स्वावलंबी झाल्याचे समाधान त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. चौधरी यांनी वोक्हार्ट रुग्णालयात अद्याप सुमारे दोन हजार रुग्णांवर गुडघा बदल व खुबा बदल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्याची माहिती यावेळी केंद्रप्रमुख अविनाश अग्रवाल यांनी दिली. (वा.प्र)