मोबाईल बॅटरीमधून होते १०० विषारी गॅसेसची निर्मिती
By Admin | Updated: October 24, 2016 16:10 IST2016-10-24T16:10:10+5:302016-10-24T16:10:10+5:30
मोबाईल फोन आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनून गेला आहे. मोबाईलशिवाय जगण्याची आपण कल्पनाच करु शकत नाही.

मोबाईल बॅटरीमधून होते १०० विषारी गॅसेसची निर्मिती
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - मोबाईल फोन आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनून गेला आहे. मोबाईलशिवाय जगण्याची आपण कल्पनाच करु शकत नाही. पण हाच मोबाईल फोन दिवसेंदिवस आपल्या शरीरासाठी घातक बनत चालला आहे. स्मार्टफोन, टॅबलेट आणि अन्य ग्राहक उपकरणांमधील बॅटरींमधून शरीराला घातक असणा-या १०० पेक्षा जास्त गॅसेसची निर्मिती होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
लिथियम बॅटरीमधून १०० पेक्षा जास्त घातक गॅसेस तयार होतात यातून कार्बन मोनोक्साईड सारखा वायूही तयार होत असल्याचे संशोधकांना आढळून आले. कार्बन मोनोक्साईडमुळे त्वचा, डोळयांची जळजळ होते तसेच पर्यावरणालाही धोका निर्माण होतो.
जास्त गरम होणारे, सुमार दर्जाच्या चार्जरपासून काय काय धोके आहेत याची मोबाईल युझर्सना कल्पनाही नाही असे अमेरिकेतील एनबीसी डिफेंस आणि चीनच्या सिंघुआ विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले. ज्या बॅटरीमुळे सर्वाधिक धोका आहे ती लिथियम आयन बॅटरी दरवर्षी दोन अब्ज उपकरणांमध्ये वापरली जाते.
इलेक्ट्रीक कार ते मोबाईलमध्ये लिथियम आयन बॅटरी वापरली जाते. जगभरातील अनेक सरकार या बॅटरीच्या वापराला प्रोत्साहन देतात पण यामुळे काय धोके आहेत त्याची फार लोकांना कल्पना नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे.