मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 15:16 IST2025-12-12T15:15:23+5:302025-12-12T15:16:55+5:30
यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे...

मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act) नाव बदलण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मनरेगाचे नाव 'पूज्य बापू ग्रामीण योजना' करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मनरेगा योजना ही जगातील सर्वात मोठ्या रोजगार हमी कार्यक्रमांपैकी एक आहे. ही योजना २००५ मध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुरू करण्यात आली होती. हिचे नाव सुरुवातीला 'राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा' (NREGA) असे होते. मात्र नंतर, त्यात बदल करून 'महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा' (MGNREGA) करण्यात आले. ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयांअंतर्गत २००५ मध्ये सुरू झाली होती. जी 'काम करण्याच्या अधिकाराची' हमी देते.
या योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे, असा आहे. २०२२-२३ पर्यंत या योजनेत १५.४ कोटी लोक सक्रियपणे कार्यरत होते. या योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना एका वर्षात १०० दिवसांचा रोजगार मिळतो. आर्थिक सुरक्षेसोबतच ही योजना पर्यावरण संरक्षण, महिला सक्षमीकरण, गाव-शहर स्थलांतर कमी करणे आणि सामाजिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरली आहे.
आता या योजनेचे नाव बदलून 'पूज्य बापू ग्रामीण योजना' केले जाण्याची शक्यता आहे, यावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.