७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:44 IST2025-05-19T14:43:06+5:302025-05-19T14:44:18+5:30
आता रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात एमजे अकबर यांना जागा देण्यात आली आहे.

७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
नवी दिल्ली - प्रसिद्ध पत्रकार आणि राजकीय नेते एमजे अकबर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीममध्ये परतले आहेत. केंद्र सरकारने दहशतवादावर पाकिस्तानचा चेहरा उघड करण्यासाठी भारताकडून सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर पाठवण्याचं ठरवले आहे. त्यात एमजे अकबर यांचाही समावेश आहे. ७ वर्षापूर्वी २०१८ साली एका वादानंतर एमजे अकबर यांना परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्रिपद सोडावे लागले होते.
आता रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात एमजे अकबर यांना जागा देण्यात आली आहे. हे शिष्टमंडळ यूनाइटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, इटली, डेन्मार्कच्या दौऱ्यावर जाणार आहे. एमजे अकबर यांची कूटनिती या मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका निभावेल. एमजे अकबर यांनी दहशतवादापासून पाकिस्तानविरोधात कायम भूमिका घेतली आहे. ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना लोक जे विचार करत नाहीत, ते मोदी शक्य करून दाखवतात असं त्यांनी म्हटलं आहे.
One mission. One message. One Bharat 🇮🇳
— Kiren Rijiju (@KirenRijiju) May 17, 2025
Seven All-Party Delegations will soon engage key nations under #OperationSindoor, reflecting our collective resolve against terrorism.
Here’s the list of MPs & delegations representing this united front. https://t.co/1igT7D21mZpic.twitter.com/3eaZS21PbC
मीटू वादात अडकले होते अकबर
२०१८ साली मी टू वादात एमजे अकबर यांना जोरदार फटका बसला. अनेक माजी महिला सहकाऱ्यांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळे एमजे अकबर यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अकबर यांनी त्यांच्यावरील आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हणत पत्रकार प्रिया रमानीविरोधात मानहानीचा दावा केला होता. २०२१ साली दिल्लीतील एका कोर्टाने रमानीला निर्दोष करत सोडून दिले. त्याविरोधात अकबर दिल्ली हायकोर्टात गेले. या वादामुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे राजकीय प्रवासात त्यांना मागे राहावे लागले.
कोण आहेत एमजे अकबर?
एमजे अकबर यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे. पत्रकारितेनंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९८९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर बिहारच्या किशनगंज येथे निवडणूक लढवली. २ वर्षांनी १९९१ साली पुन्हा लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ साली ते भाजपात सहभागी झाले. १ वर्ष पक्षाचे प्रवक्ते पद सांभाळल्यानंतर २०१५ साली एमजे अकबर यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यानंतर सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री बनवण्यात आले. २०१८ साली मी टू आंदोलनात एमजे अकबर यांच्यावरही आरोप झाले आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.