Corona Vaccination: पुण्यात झाला महत्त्वाचा प्रयोग; 'कॉकटेल' जादू करणार, लसीकरणाला कलाटणी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 08:07 IST2021-08-09T08:06:13+5:302021-08-09T08:07:56+5:30
Corona Vaccination: पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेत हे प्रयोग केले

Corona Vaccination: पुण्यात झाला महत्त्वाचा प्रयोग; 'कॉकटेल' जादू करणार, लसीकरणाला कलाटणी मिळणार
नवी दिल्ली : कोवॅक्सिन व कोविशिल्ड लस कोरोना रुग्णांना स्वतंत्रपणे देण्यापेक्षा या दोन्ही लसींचे मिश्रण दिल्यास ते अधिक प्रभावी ठरते, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने केलेल्या प्रयोगांतून आढळून आले आहे.
पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेत हे प्रयोग केले. या दोन्ही लसींचे मिश्रण दिल्यास त्यामुळे रुग्णाला कोणताही अपाय होत नाही व त्याची प्रतिकारशक्तीही इतर वेळेपेक्षा अधिक वाढते. ९८ जणांवर केलेल्या प्रयोगांनंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये १८ जणांना नजरचुकीने दोन्ही लसी दिल्या होत्या. त्यांच्या प्रकृतीचाही यात अभ्यास करण्यात आला. त्यांच्यावर कोणताही विपरित परिणाम झाल्याचे आढळले नाही. दोन लसींचे मिश्रण करून ते रुग्णांना दिल्यानंतर नेमका काय परिणाम होतो, असा अभ्यास देशात याआधी झाला नव्हता. आयसीएमआरने म्हटले आहे की, ज्या रुग्णांनी कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही एका लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांच्या तुलनेत दोन्ही लसींचे मिश्रण घेतलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. विषाणूच्या अल्फा, बिटा, डेल्टा या प्रकारांविरोधात लसींचे मिश्रण परिणामकारक ठरले आहे.
लसीकरणाला मिळू शकते कलाटणी
हे निष्कर्ष केंद्रीय आरोग्य खात्याने स्वीकारल्यास या दोन्ही लसींच्या मिश्रणातून नवी लस तयार होऊन शकते. पण तसा कोणताही निर्णय केंद्राने अद्याप घेतलेला नाही.
लसींचे मिश्रणाच्या अभ्यासास औषध महानियंत्रकांनी गेल्या महिन्यात संमती दिली. वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने ही परवानगी मागितली होती.