मिक्स्ड बॅग वर्ष...!
By Admin | Updated: May 10, 2015 04:10 IST2015-05-10T04:10:03+5:302015-05-10T04:10:03+5:30
नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदाचे एक वर्ष हे मिक्स्ड बॅगसारखे आहे. या वर्षाकडे पाहिले तर काही खूप चांगल्या गोष्टी तर काही निराशाजनक असे चित्र समोर आहे. या सरकारच्या तीन

मिक्स्ड बॅग वर्ष...!
राजदीप सरदेसाई, (लेखक राजकीय विश्लेषक आहेत.)-
नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदाचे एक वर्ष हे मिक्स्ड बॅगसारखे आहे. या वर्षाकडे पाहिले तर काही खूप चांगल्या गोष्टी तर काही निराशाजनक असे चित्र समोर आहे. या सरकारच्या तीन चांगल्या गोष्टी आणि तीन त्रुटी सांगता येतील.
मोदींनी जेव्हा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांची काम करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती आणि एनर्जी या सगळ्यात मोठ्या जमेच्या बाजू होत्या. ते जातीने स्वत: प्रत्येक कामात लक्ष घालू लागले. मग ते स्वच्छ भारत अभियान असो की मेक इन इंडियासारखा विषय असो. प्रभावी मार्केटिंगमुळे या दोन्ही योजना आज प्रत्येक भारतीयाला माहिती झाल्या आहेत. या दोन्ही योजना मोदींनी इतर कोणावर सोपवलेल्या नाहीत.
दुसरी जमेची बाजू होती परदेशी धोरणाबद्दलची. मोदींनी यातदेखील स्फूर्तिदायक काम केले असे म्हणावे लागेल. यापूर्वी ज्या देशांमध्ये कधीही आपले नेते गेले नव्हते किंवा खूप वर्षांपूर्वी भेट दिली होती अशा देशापर्यंत मोदी स्वत: पोहोचले. मग ते कॅनडा असो अथवा कोरिया. त्यातून आपल्या देशासाठी आशादायक चित्र तयार होण्यास मदत झाली.
माझ्या मते तिसरी गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे ती म्हणजे या सरकारच्या विरोधात कोणताही मोठा घोटाळा, मोठे स्कॅम किंवा भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप झाला नाही. पंतप्रधान कार्यालयात लाच घेताना हजारदा विचार करावा लागेल कारण तशी जरब निर्माण करण्यात मोदी यशस्वी झाले. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयात भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.
पण यासोबतच काही उणिवादेखील मोदी सरकारच्या आहेत. त्यात पहिली उणीव आहे ती अर्थव्यवस्थेत मोदी सरकार मागे पडल्याची. या सरकारचा पहिला असो की दुसरा अर्थसंकल्प; मोदी सरकार फार काही प्रभाव पाडू शकले नाही. हा अर्थसंकल्प कागदावर जितका प्रभावी दिसला तेवढा तो गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकला नाही. आजही गुंतवणूकदार या सरकारच्या योजनांविषयी साशंक आहेत. त्यामुळे मला असे वाटते की, मोदी सरकार अर्थकारणाच्या क्षेत्रात फार काही प्रभावी दिसत नाही.
खूप दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत हे चांगले लक्षण आहे, परंतु मोदी सरकारने जे वादे केले होते ते काही केल्या प्रत्यक्षात येताना दिसत नाहीत. त्यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह कायम आहे.
दुसरी महत्त्वाची उणीव म्हणजे मोदींची एकाधिकारशाही. मोदीजी निर्णय घेताना कोणाला फार स्वातंत्र्य देत असावेत असे मला वाटत नाही. बरेच निर्णय घेण्याचे अधिकार हे पंतप्रधान कार्यालयाकडेच आहेत. त्यामुळे अधिकारी, मंत्री निर्णय घेताना दिसत नाहीत. बऱ्याचदा ते पंतप्रधान कार्यालयातून आदेश येण्याची वाट पाहत बसतात. ही खूप मोठी उणीव आहे मला वाटते. त्यामुळे कामाचा वेग मंदावत चालला आहे असे आता बरेच उद्योजक म्हणू लागले आहेत.
तिसरी अत्यंत महत्त्वाची उणीव जी वरच्या मुद्द्याशी निगडित आहे ती म्हणजे, आजही मोदीजी हे ‘वन मॅन शो’ असेच दिसतात. काही लोकांना असे वाटते की मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात, देशाच्या पंतप्रधानांसारखे वागत नाहीत. देशाच्या पंतप्रधानांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालावे, अशी अपेक्षा असली तरी ‘सब का साथ’ घेताना मोदीजी संसदेत आणि संसदेबाहेरही दिसत नाहीत. तुम्ही पंतप्रधान आहात त्यामुळे ममता बॅनर्जी असो किंवा अन्य कोणी, तुम्ही सारखी टीका करत बसू शकत नाही.
तुम्हाला विरोधकांना सोबत घेऊनच कामे पूर्ण करावी लागतील. एकीकडे त्यांच्यावर टीका करायची आणि दुसरीकडे त्याच विरोधकांनी तुमच्यासोबत काम करावे, तुम्हाला सहकार्य करावे, अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. आता कदाचित त्यांच्या या वागण्यातून त्यांनीच धडा घेतलेला दिसतोय, कारण गेल्या काही दिवसांत मोदीजी विरोधकांबरोबर काम करण्याच्या मन:स्थितीत येताना दिसत असले तरीही आजपर्यंत त्यांनी कोणत्याही मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावलेली
नाही. आता लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत काम करण्याची वेळ आलेली आहे. तुमचे एक पार्टीचे सरकार असले तरीही विरोधकांना सोबत घेऊन काम करणे ही काळाची गरज आहे. मोदीजी फेडरल स्पीरीटबद्दल बोलतात; पण तसे वागताना मात्र दिसत नाहीत... म्हणून मला असे वाटते की, मोदी सरकारचे एक वर्ष हे मिक्स्ड बॅगसारखे आहे. पेला अर्धा भरला आहे आणि अर्धा रिकामादेखील आहे.
मोदीजींनी लोकांच्या अपेक्षा खूप वाढवून ठेवल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच लोकांना असे वाटायला लागले आहे की मोदीजी एखाद्या जादूगारासारखे येतील आणि या देशाला बदलून टाकतील! पण असे होत नाही आणि ते एवढे बोलतात की त्यामुळेदेखील लोकांच्या अपेक्षा आणखी वाढतात. खरेतर, ते खूप चांगले ‘कम्युनिकेट’ करतात. आपले म्हणणे जाहीरपणे मांडतात ही चांगली गोष्ट आहे पण तुम्ही बोलता, प्रॉमीस करता आणि त्याच्या पूर्ततेसाठी काहीही करीत नाही. त्यामुळे हे सगळे भ्रमनिरास झाल्यासारखे आहे. कमी बोलावे आणि जास्त करावे याप्रमाणे ते वागताना दिसत नाहीत.