मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात हवाई दलाच्या लढाऊ विमानालाअपघात झाला असून, या दुर्घटनेत संपूर्ण विमान जळून खाक झाले आहे. सुदैवाने या अपघातात विमानातील दोन्ही पायलट सुखरूप बचावले आहेत.
या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील सानी गावाजवळ हवाई दलाचे मिराज २००० हे लढाऊ विमान अपघातग्रस्त होऊन कोसळले. अपघातानंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले असून, त्यामध्ये वैमानिक आपल्या सहकाऱ्यांना फोन करून अपघाताची माहिती देताना दिसत आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.
नियमित सरावादरम्यान हे विमान कोसळलं असून, आतापर्यंत या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.