मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री विजय शाह हे कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात कोर्टाने कमालीची आक्रमक भूमिका घेतली असून, सोफिया कुरेशींबाबत केलेल्या विधानाची स्वत:च दखल घेत मध्य प्रदेश हायकोर्टाने विजय शाह यांच्याविरोधात चार तासांच्या आत एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश देताना सांगितले की, विजय शाह यांच्यावर तत्काळ एफआयआर दाखल झाली पाहिजे. कोर्टाने या प्रकरणी राज्याचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांनाही सक्त आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही परिस्थितीत एफआयआर दाखल झाली पाहिजे, असे सांगितले.
हायकोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी सकाळी करण्याचे निश्चित केले आहे. कोर्टाच्या या आदेशानंतर राज्य प्रशासन आणि पोलिस खात्यामध्ये हालचालींना वेग आला आहे.
मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी एका सभेला संबोधित करताना पाकिस्तानी दहशतवाद्यांचं नाव न घेता एक विधान केलं होतं. आम्ही त्यांच्या बहिणीला पाठवून त्यांची ऐशीतैशी करून टाकली, असे विजय शाह म्हणाले होते. त्या विधानावरून वादाला तोंड फुटलं आहे.