उत्तर प्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंह यांनी मतदारसंघातील बलियामध्ये नुकताच बांधलेला पूल जनतेसाठी सुरू केल्यावर पीडब्ल्यूडी इंजिनिअरवर जोरदार टीका केली. दयाशंकर यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकारी इंजिनिअरला फटकारलं आणि म्हणाले, "जास्त डोकं फिरवू नका. मी येथील मंत्री आहे. तुम्ही मला न सांगता पूल सुरू केला. तुम्ही कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहात हे मला माहिती आहे." "तुम्ही येथून निवडणूक लढवत आहात का? बसपा तुम्हाला तिकीट देत आहे का? कदाचित आमदार तुम्हाला तिकीट मिळवून देण्यात मदत करत असतील." मंत्र्यांनी नंतर पत्रकारांना सांगितलं की, इंजिनिअरला यापूर्वी वारंवार विनंती करूनही पूल सुरू केला नाही यासाठी औपचारिक चाचणी आणि प्रशासकीय मंजुरीचा अभाव असल्याचं कारण दिलं होतं. परंतु मंगळवारी अचानक, आमच्या परवानगीशिवाय किंवा माहितीशिवाय पूल सुरू करण्यात आला जेणेकरून आम्हाला श्रेय मिळू नये. हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले जाईल.
मंत्र्यांनी परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्वासार्हतेबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हणाले, "२०१५ पासून आधीच पैसे देऊनही येथे एकही गटार बांधण्यात आलेला नाही. या सरकारमध्ये एक अधिकारी इतका शक्तिशाली कसा असू शकतो? तो मंत्री, आमदार आणि अगदी नगर पालिका अधिकाऱ्यांकडेही दुर्लक्ष करत आहे. उच्च सुरक्षा असलेला कोणीतरी असावा."
मंत्री दयाशंकर सिंह काल रात्री बलियाच्या कठल नाल्यावर बांधलेल्या पुलाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांना समजलं की तो उद्घाटनाशिवाय जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. ते घटनास्थळी उपस्थित असलेल्या इंजिनिअरवर संतापले. या संपूर्ण प्रकरणात, पीडब्ल्यूडीच्या एक्सआयएनने सांगितलं की पुलाचे उद्घाटन झालेलं नाही, फक्त रस्ता सुरू करण्यात आला आहे जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल.