भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्याचा अविभाज्य भाग असलेल्या मिग-२१ या विमानांनी बिकानेरच्या नाल येथील हवाई तळावर आज शेवटचे उड्डाण घेतले. या विमानांना २६ सप्टेंबर रोजी चंदीगढ येथे आयोजित एका विशेष समारंभात औपचारिक निरोप दिला जाईल. मिग-२१च्या या प्रतिकात्मक निवृत्तीच्या वेळी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंह यांनी नाल येथून 'मिग-२१'मध्ये उड्डाण केले. तब्बल ६२ वर्षांहून अधिक काळ भारतीय हवाई दलाची सेवा करणाऱ्या या रशियन बनावटीच्या लढाऊ विमानाचे हे अखेरचे उड्डाण अनेक पिढ्यांसाठी एक भावूक क्षण होता.
'मिग-२१'ने भारताची केली सेवा!उड्डाणानंतर एअर चीफ मार्शल सिंह म्हणाले की, "१९६० च्या दशकात सेवेत आल्यापासून मिग-२१ हे भारतीय हवाई दलाचे सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान राहिले आहे. आजही आम्ही त्याचा वापर करत आहोत." ते म्हणाले की, हे विमान जगातील सर्वात जास्त प्रमाणात उत्पादित झालेल्या सुपरसॉनिक लढाऊ विमानांपैकी एक आहे. जगभरात ६० हून अधिक देशांनी ११,००० पेक्षा जास्त विमाने वापरली आहेत.
एपी सिंह यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले, "मिग-२१ सोबतचा माझा पहिला अनुभव १९८५ मध्ये तेजपूर येथे होता, जेव्हा मी त्याचे टाइप-७७ व्हेरिएंट उडवले. तो एक अविश्वसनीय अनुभव होता. हे एक अत्यंत चपळ, गतिशील आणि साधे डिझाइन असलेले विमान आहे. याला उडवण्यासाठी सुरुवातीच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असली, तरी एकदा सराव झाल्यावर ते एक अद्भुत विमान आहे आणि ज्यांनी हे विमान उडवले आहे, तो प्रत्येक पायलट या विमानाला नक्कीच मिस करेल."
मिग-२१च्या इंटरसेप्टर म्हणून केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत हवाई दल प्रमुख म्हणाले, "याला शत्रूच्या विमानांना रोखण्यासाठी बनवले होते आणि या भूमिकेत त्याने भारताची उल्लेखनीय सेवा केली. पण, प्रत्येक गोष्टीला एक ठराविक वेळ असतो. आता ही विमाने जुनी झाली आहेत आणि त्यांची देखभाल करणेही कठीण झाले आहे. आता तेजस, राफेल आणि सुखोई-३० सारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या विमानांकडे वळण्याची वेळ आली आहे."
तेजस घेणार मिग-२१ ची जागाएअर चीफ मार्शल सिंह यांनी सांगितले की, तेजस हे मिग-२१ चा पर्याय म्हणून डिझाइन करण्यात आले आहे. ते म्हणाले, "तेजस हे मिग-२१ ची जागा घेईल, पण त्याला आणखी विकसित करावे लागेल. तेजससाठी नवीन शस्त्रास्त्रांचाही विचार करावा लागेल." त्यांनी आशा व्यक्त केली की, ८३ विमानांचा करार झाला असून, तेजस त्याच्या विविध व्हेरिएंटमध्ये हळूहळू भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आपले स्थान निर्माण करेल.
युद्धात मिग-२१ चे ऐतिहासिक योगदान!हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर जयदीप सिंह यांनी मिग-२१ च्या ऐतिहासिक योगदानाला उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, "या विमानाने १९६५ च्या युद्धात सहभाग घेतला होता आणि १९७१ च्या युद्धात विशेषतः १४ डिसेंबर रोजी ढाकामध्ये राज्यपालांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी राजीनामा दिला आणि १६ डिसेंबर रोजी पाकिस्तानने शरणागती पत्करली."
१९९९ मध्ये ऑपरेशन सफेद सागर अंतर्गत कारगिलमध्येही मिग-२१ ने आपला पराक्रम दाखवला, जेव्हा त्याने भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या एका पाकिस्तानी अटलांटिक विमानाला पाडले. त्यानंतर २०१९ मध्ये, मिग-२१ पुन्हा चर्चेत आले जेव्हा त्याने एका एफ-१६ विमानाला पाडले. अशाप्रकारे, मिग-२१ हे भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय राहिले आहे.