ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : दलाल क्रिश्चियन मिशेल वाजपेयी सरकारमध्येही होता सक्रीय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 10:55 IST2017-10-27T10:57:15+5:302018-01-09T10:55:45+5:30
तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये एनडीएच्या घटकपक्षातील समता पार्टीमधील अतिशय प्रभावशाली नेत्या जया जेटली यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी नवा गौप्यस्फोट केला आहे.

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : दलाल क्रिश्चियन मिशेल वाजपेयी सरकारमध्येही होता सक्रीय?
नवी दिल्ली - तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये एनडीएच्या घटकपक्षातील समता पार्टीमधील अतिशय प्रभावशाली नेत्या जया जेटली यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी नवा गौप्यस्फोट केला आहे. अटल बिहार वाजपेयी पंतप्रधान असताना ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करारासाठी लॉबिंग करणा-यांनी त्यावेळी मला संपर्क केला होता,असे दावा जया जेटली यांनी केला आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार,संरक्षण विभागातील करारांचा मध्यस्थी क्रिश्चियन मिशेलनं संपर्क केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
'मदत केल्यास त्या पैशांचा ढिगारा जमा करू शकतात', असे मिशेलनं एका भेटीदरम्यान म्हटल्याचा दावा त्यांनी केला आहे.
क्रिश्चियन मिशेल त्यावेळी चर्चेत आला जेव्हा तत्कालीन मनमोहन सिंग सरकारच्या काळात ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात त्याचं उघड झाले होतं. जया जेटली यांच्या दाव्यानुसार त्यांना परदेशातून एक फोन आला होता. त्या व्यक्तीनं आपली ओळख क्रिश्चियन मिशेल अशी सांगितली.
फोनवर झालेल्या बोलणीनंतर जया यांनी क्रिश्चियन मिशेलला दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे भेटण्यास तयारी दर्शवली. या दोघांची भेट 1999 सुरू झालेल्या कारगिल युद्धाच्या काही दिवसांपूर्वी झाला. समता पार्टीचे जॉर्ज फर्नांडिस तेव्हा तत्कालीन वाजपेयी सरकारमध्ये संरक्षणमंत्री होते. 'मिशेलनं यावेळी भारतात सक्रिय असलेल्या डिफेन्स डीलर्सबाबत माहिती दिली आणि अनेक प्रशासक खिशात असल्याचं सांगितले', असा दावादेखील जया जेटली यांनी केला. यानंतर मिशेलनं थेट पैसे कमावण्याची ऑफर समोर ठेवली, असा आरोपही जेटली यांनी केला आहे. दरम्यान मिशेलनं आपल्या हेतूबाबत उघडपणे काहीही सांगितले नाही, असेही त्यांनी सांगितले.
पैशांच्या ऑफरवर जया जेटलींनी मिशेलला सांगितले की,'आम्ही अशी कोणतीही गोष्ट करत नाही'. यावर, 'तुम्ही आपला पक्ष कसा चालवणार?', असा प्रश्न त्यानं जेटलींना विचारला. यानंतर जेटलींनी मिशेलसोबत भेट तातडीनं आटोपती घेतली आणि त्यादिवशी संध्याकाळी जॉर्ज फर्नांडिस यांना घडलेला प्रकार सांगितला. यावर, मिशेलसोबत झालेल्या भेटीचा संपूर्ण तपशील संरक्षण विभागाला लेखी स्वरुपात द्यावा, असा सल्ला यावेळी फर्नांडिस यांनी दिल्याचाही जया जेटली यांनी सांगितले. दुस-या तसा तपशील त्यांनी लिहून दिला.
यानंतर मिशेलनं जवळपास त्यांना 6-7 वेळा फोन केला. मात्र त्याला भेटण्यास किंवा कोणत्याही प्रकारे चर्चा करण्यास नकार दिल्याचं जया जेटलींनी सांगितले. यानंतर ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणात त्याचे नाव समोर आल्याचे समजल्याचे जेटलींनी सांगितले.