मराठा स्राम्राज्याने अनेकदा आपल्या देशाला परकीय आक्रमणांपासून वाचविले होते. पार अगदी अटकेपार झेंडे रोवले होते. पराक्रमी मराठा सैन्याने पार अगदी कराचीच्या पुढे आपली भगवी पताका फडकावलेली होती. हा इतिहास असताना राजस्थानला मात्र हा मराठा साम्राज्याचा नकाशा डोळ्यात खुपू लागला आहे. राजस्थानचा मोठा भाग मराठा साम्राज्यात दाखविल्याने राजस्थानात वाद सुरु झाला आहे.
एनसीईआरटीच्या आठवी इयत्तेतील पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. Exploring Society: India and Beyond नावाच्या या पुस्तकात मराठा साम्राज्यावर एक धडा देण्यात आला आहे. या धड्यामध्ये मराठा साम्राज्याचा नकाशा देण्यात आला आहे. या नकाशावरून राजस्थानमध्ये वाद सुरु झाला आहे. ऐतिहासिक तथ्यांवर हा नकाशा असला तरीही राजस्थानात राजकारण सुरु झाले असून राजपूत घराण्यांचा हा अपमान असल्याचे आरोप केले जात आहेत.
या पाठ्यपुस्तकात मेवाड़, जैसलमेर, बूंदी, जयपुर आणि अन्य भाग हा मराठा साम्राज्यात होता असे दाखविण्यात आले आहे. परंतू राजस्थानी हे मानायला तयार नाहीत. राजस्थानच्या ही राजेशाही संस्थाने कधीही मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली गेली नव्हती असा दावा राजपूत आणि माजी राजघराण्यांनी केला आहे. राजस्थानची ही संस्थाने कधीही मराठा राजवटीखाली नव्हती आणि त्यांचा गौरवशाली इतिहास पुसून टाकण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप केला जात आहे.
जैसलमेरच्या राजघराण्यातील चैतन्य राज सिंह, राजसमंदमधील भाजप खासदार महिमा कुमार, त्यांचे पती आणि नाथद्वारा येथील भाजप आमदार विश्वराज सिंह, काँग्रेस नेते प्रताप सिंह खाचरियावास, काँग्रेस नेते भंवर जितेंद्र सिंह यासारख्या नेत्यांनी या नकाशाला विरोध केला आहे. एनसीईआरटीच्या सामाजिक विज्ञान विभागाचे प्रमुख आणि आयआयटी गांधीनगर येथील पुरातत्व विज्ञानाचे अतिथी प्राध्यापक मायकेल डॅनिनो यांनी यावर खुलासा केला आहे. हा नकाशा जुन्या आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या स्त्रोतांवर आधारित आहे, परंतु जर काही चूक आढळली तर पुस्तकात आवश्यक त्या सुधारणा करू, असे ते म्हणाले आहेत.